मुंबई : तसं पाहिलं तर कोणत्याही खेळाबाबत आधीच अंदाज बांधणं कठीण असतं. पण मागची आकडेवारी पाहता एक अंदाजित आकडेमोड केली जाते. त्यावरून कोणता संघ वरचढ ठरू शकतो याबाबत अंदाज बांधला जातो. वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत आता श्रीलंका आणि न्यूझीलंड हे संघ आमनेसामने येणार आहेत. उपांत्य फेरीच्या दृष्टीने या सामन्याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. या सामन्यात न्यूझीलंडचं पारडं जड असलं तरी श्रीलंका त्यांच्या स्वप्नांवर पाणी फेरू शकते. न्यूझीलंडने सुरुवातीच्या चार सामन्यात सलग विजय मिळवला. त्यानंतर विजयाची गाडी रुळावरून घसरली आणि सलग 4 पराभवाचं तोंड पाहावं लागलं. तर श्रीलंकेनं आतापर्यंत खेळलेल्या 8 पैकी 2 सामन्यात विजय मिळवला आहे. श्रीलंकेने हा सामना गमावला तर चॅम्पियन ट्रॉफीत स्थान मिळवणं कठीण होईल.
न्यूझीलंड आणि श्रीलंका आतापर्यंत 101 वनडे सामने खेळले आहेत. यात न्यूझीलंडने 51 सामन्यात, तर श्रीलंकेने 41 सामन्यात विजय मिळवला आहे. 8 सामने अनिर्णित ठरले असून एक सामना टाय झाला आहे. वनडे वर्ल्डकपमधये हे दोन्ही संघ 11 वेळा आमनेसामने आले आहेत. यात 5 सामन्यात न्यूझीलंडने, तर 6 सामन्यात श्रीलंकेने विजय मिळवला आहे.
रचिन रविंद्र, डेरिल मिचेल हे खेळाडू चांगल्या फॉर्मात आहेत. पण न्यूझीलंडचा सलामी फलंदाजी डेवॉन कॉनव्हे फेल होत आहे. त्यामुळे या सामन्यात त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. तर ईश सोढीच्या जागी संघात काइल जॅमिसनला संधी मिळू शकते. तर श्रीलंकेचा कर्णधार कुसल मेंडिस खराब फॉर्मातून जात आहे. सदीरा समरविक्रमा यानेही आपल्या फलंदाजीची छाप सोडली आहे. गोलंदाजीत फक्त दिलशान मदुशंकाने प्रभाव टाकला आहे.
श्रीलंका : पथुम निसांका, कुसल परेरा, कुसल मेंडिस (विकेटकीपर/कर्णधार), सदीरा समरविक्रमा, चरिथ असलांका, अँजेलो मैथ्यूज, धनंजय डीसिल्वा, महेश थीक्षाना, दुष्मंथा चमीरा, कासुन राजिथा आणि दिलशान मदुशंका.
न्यूझीलंड : डेवोन कॉनव्हे, रचिन रविंद्र, केन विलियमसन (कर्णधार), डेरिल मिचेल, टॉम लॅथम (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमॅन, मिचेल सँटनर, काइल जॅमीसन, टिम साउथी आणि ट्रेंट बोल्ट.