बंगळुरु | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधील 35 व्या सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान आमनेसामने आहेत. न्यूझीलंडने पाकिस्तानच्या गोलंदाजांना झोडून काढलं. रचिन रविंद्र याच्या 108 आणि कॅप्टन केन विलियमनसन याच्या 95 धावांच्या मदतीने न्यूझीलंडला 400 पेक्षा अधिक धावा करण्यात यश आलं. न्यूझीलंडने पाकिस्तानला विजयासाठी
402 धावांचं आव्हान दिलं. पाकिस्तानला वर्ल्ड कपमधील आव्हान कायम राखण्यासाठी हा सामना अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे पाकिस्तानही तयारीने या 402 धावांच्या डोंगराएवढ्या आव्हानाच्या पाठलागासाठी मैदानात उतरली. मात्र पाकिस्तानने अवघ्या 6 धावांवर पहिली विकेट गमावली.
पाकिस्तानकडून अब्दुल्लाह शफीक आणि फखर झमान सलामी जोडी मैदानात आली. मात्र टीम साऊथीने शफीकला 4 धावांवर आऊट करत पाकिस्तानला पहिला झटका दिला. मात्र त्यानंतर कॅप्टन बाबर आझम आणि फखर झमान या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी आतापर्यंत धमाकेदार पार्टनरशीप केली आहे. फखर झमान न्यूझीलंड्या बॉलिंगवर तुटून पडला. फखरने मैदानात चौफेर फटकेबाजी करत वर्ल्ड कपमध्ये खणखणीत शतक ठोकलंय. फखरच्या या शतकी खेळीमुळे पाकिस्तानच्या चाहत्यांना विजय दिसायला लागलाय.
फखरने अवघ्या 63 बॉलच्या मदतीने आणि 158.73 च्या स्ट्राईक रेटने हे शतक पूर्ण केलं. फखरने या शतकी खेळीत 9 सिक्स आणि 6 चौकार ठोकले. फखरने या दरम्यान न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. फखरच्या वनडे कारकीर्दीतील हे 11 वं शतक ठरलं. फखरने यासह इतिहास रचलाय. फखर वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानकडून वेगवान शतक करणारा पहिला फलंदाज ठरलाय. फखरने याबाबतीत पाकिस्तानचा माजी फलंदाज इमरान नजीर याचा विक्रम मोडलाय. इमरानने 95 बॉलमध्ये वर्ल्ड कपमध्ये शतक केलं होतं. इमरानने 2007 च्या वर्ल्ड कपमध्ये झिंबाब्वे विरुद्ध हा कारनामा केला होता.
फखरचं शतक हे वर्ल्ड कप 2023 मधील पाचवं वेगवान शतक ठरलंय. या 13 व्या वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत वेगवान शतकाचा विक्रम हा ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेल याच्या नावावर आहे. मॅक्सवेल याने नेदरलँड्स विरुद्ध 40 चेंडूत शतक ठोकलं. होतं. दुसऱ्या क्रमांकावर एडन मारक्रम (49 बॉल), तिसऱ्या स्थानी ट्रेव्हिस हेड (59 बॉल) आणि चौथ्या क्रमांकावर हेनरिच क्लासेन आहे. हेनरिचने इंग्लंड विरुद्ध 61 बॉलमध्ये सेंच्युरी केली.
फखर झमानची वादळी खेळी
11th ODI hundred for Fakhar Zaman! 💯
He smashes the record for the fastest hundred by a Pakistani in the World Cup, getting there off 63 balls (previous fastest – 95 balls by Imran Nazir). 🔥#NZvPAK | #CWC23 | #IsBaarUsPaar pic.twitter.com/JcBE8Xtyc2
— Grassroots Cricket (@grassrootscric) November 4, 2023
दरम्यान पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ थांबवावा लागला आहे. पाकिस्तानने तोवर 21.3 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 160 धावा केल्या आहेत. फखर 106 आणि कॅप्टन बाबर आझम 47 धावांवर नाबाद आहेत. पाकिस्तानला विजयसाठी आणखी 242 धावांची गरज आहे.
न्यूझीलंड प्लेईंग ईलेव्हन | डेव्हॉन कॉनवे, रचिन रवींद्र, केन विल्यमसन (कर्णधार), डॅरिल मिचेल, टॉम लॅथम (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मिचेल सँटनर, ईश सोढी, टीम साऊथी आणि ट्रेंट बोल्ट.
पाकिस्तान प्लेईंग ईलेव्हन | बाबर आझम (कॅप्टन), अब्दुल्ला शफीक, फखर जमान, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), सौद शकील, इफ्तिखार अहमद, आगा सलमान, हसन अली, शाहीन आफ्रिदी, मोहम्मद वसीम जूनियर आणि हरिस रौफ.