भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तिसरा कसोटी सामना मुंबईत होणार आहे. 1 नोव्हेंबरपासून तिसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात होईल. खरं तर तिसऱ्या सामन्यातही न्यूझीलंडचं पारडं जड आहे. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात विजय वाटतो तितका सोपा नाही, असं क्रीडाप्रेमींचं म्हणणं आहे. पहिल्या कसोटीतील पराभवानंतर दुसऱ्या कसोटीत वॉशिंग्टन सुंदरची एन्ट्री झाली होती. आता सलग दोन पराभवानंतर तिसऱ्या कसोटीत आणखी एक बदल होण्याची शक्यता आहे. टीम इंडियाने तिसऱ्या कसोटीसाठी वेगवान गोलंदाज हर्षित राणाला स्क्वॉडमध्ये सहभागी केलं आहे. त्यामुळे मुंबई कसोटीत पदार्पण करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तिसऱ्या कसोटीसाठी जसप्रीत बुमराहला आराम दिला जाण्याची चर्चा रंगली आहे. पण याबाबत अधिकृत असं काहीच समोर आलेलं नाही. दुसरीकडे, हर्षित राणा सध्या फॉर्मात आहे. इतकंच काय तर त्याला बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी संघात स्थानही मिळालं आहे. हर्षित राणा फक्त 22 वर्षांचा असून त्याला इतक्या कमी वयात संघात स्थान मिळालं आहे.
हर्षितने नुकतंच आसाम विरूद्धच्या सामन्यात पाच विकेट घेतल्या आहेत. तसेच फलंदाजीतही दम दाखवत अर्धशतक ठोकलं आहे. त्यामुळे गोलंदाजी आणि फलंदाजी पाहता त्याला संघात सहभागी करून घेतलं आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत हर्षित राणा हुकूमाचं पान ठरू शकतो, असं क्रीडाप्रेमींचं म्हणणं आहे. हर्षित राणा आतापर्यंत देशांतर्गत क्रिकेटमध्ये 9 फर्स्ट क्लास सामने खेळला असून 36 विकेट घेतल्या आहे. एका डावात पाच विकेट घेण्याचा कारनामाही केला आहे. या व्यतिरिक्त एका सामन्यात 10 विकेट घेण्याची किमया साधली आहे. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये हर्षितने 41 च्या सरासरीने 410 धावाही केल्या आहेत.
दरम्यान, हर्षित राणाला प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळणार की नाही? याबाबत स्पष्टता नाही. पण मुंबई कसोटीत वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला आराम दिला जाण्याची शक्यता आहे. जर तसं झालं तर त्याचा पर्याय म्हणून हर्षित राणाला संधी मिळू शकते. दुसरीकडे, मोहम्मद सिराजही वेटिंगवर आहे. पुणे कसोटीत त्याला आराम दिला होता. हर्षितची निवड ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी केली आहे. तत्पूर्वी न्यूझीलंडविरुद्ध सामना खेळून एक अनुभव गाठीशी बांधू शकतो.