टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेत रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली. वेस्ट इंडिजमध्ये रंगलेल्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण अफ्रिकेचा पराभव केला आहे. गेल्या 11 वर्षांपासून असलेला आयसीसी चषकांचा दुष्काळ टीम इंडियाने दूर केला. अंतिम सामन्याचा थरार क्रीडारसिक आयुष्यभर स्मरणात ठेवतील. दुसरीकडे, या कामगिरीसाठी टीम इंडियाच्या खेळाडूंवर कोट्यवधी रुपयांची उधळण झाली. पण प्रत्येकाला या स्पर्धेतून फायदा झालं असं नाही. काही जणांचं यात नुकसानही झालं आहे. आयसीसीकडे दाखल केलेल्या विनंती अर्जातून ही बाब उघड झाली आहे. यात 100 मिलियन डॉलर म्हणजेच 830 कोटी रुपयांचं मागणी केली आहे. नुकसान खेळाडूंचं नाही तर ब्रॉडकास्टर्सचं झालं आहे. अमेरिकेतील सामन्यांमुळे ब्रॉडकास्टरला आर्थिक फटका सहन करावा लागला आहे. साखळी फेरीतील सामन्यांसाठी न्यूयॉर्कच्या नसाउमध्ये तात्पुरत्या स्वरुपाचं स्टेडियम तयार करण्यात आलं होतं. या मैदानात रंगलेल्या सामन्यामुळे सर्वच गणित बिघडलं. दुसरं, 15 जूनचा सामना लॉडरहिल मैदानात होणार होता मात्र त्यावरही पावसाचं पाणी पडलं. त्यामुळे ब्रॉडकास्टरचं नुकसान झालं.
भारत पाकिस्तान सामना न्यूयॉर्कच्या नसाउ स्टेडियममध्ये पार पडला. हा सामन्यात कमी धावसंख्येचा झाला. त्यामुळे सामन्यात हवी तशी रंगत आली नाही.तर 15 जूनला लॉडरहिल येथे भारत आणि कॅनडा यांच्यात सामना होणार होता. पण पावसामुळे हा सामना रद्द करण्याची वेळ आली. त्यामुळे ब्रॉडकास्टरचं पैशांचं गणित बिघडलं. इतकंच काय तर अफगाणिस्तान आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात खेळला गेलेला उपांत्य फेरीचा सामना असाच झाला. हा सामना दोन्ही संघांची षटकं पकडली तर फक्त 21 षटकात संपला. म्हणजेच ठरलेल्या वेळेच्या आधी निकाल लागला होता. त्यामुळे जाहिरातदारांसह ब्रॉडकास्टरचं नुकसान झालं.
क्रिकबझच्या रिपोर्टनुसार, ब्रॉडकास्टरने आयसीसीला दोन विनंती पत्र पाठवली आहेत. यात त्यांनी टी20 वर्ल्डकप स्पर्धेमुळे झालेल्या नुकसानीचा उल्लेख केला आहे. तसेच ब्रॉडकास्टिंग डीलमधून 100 मिलियन डॉलर्सची सवलत मागितली आहे. मागच्या वर्षी आयसीसीने ब्रॉडकास्टिंग राइट्स विकले होते.डिस्नी स्टार्सने 3 बिलियन डॉलर म्हणजेच 25 हजार कोटींनी हे राइट्स विकत घेतले होते. या कराराची सुरुवात टी20 वर्ल्डकपपासून सुरु झाली होती. दरम्यान, ब्रॉडकास्टरच्या या विनंती पत्रावर मागच्या महिन्यात कोलंबो येथे बोर्ड मीटिंगमध्ये चर्चा झाली होती. आता आयसीसी ब्रॉडकास्टरची विनंती मान्य करते की नाही हे पाहणं औत्सुक्याचं आहे.