मुंबई : यंदाच्या वन डे वर्ल्ड कप 2023 चं आयोजन भारतामध्ये असल्याने टीम इंडिया प्रबळ दावेदार मानलं जात आहे. कारण टीम इंडियाला त्यांच्याच भूमीत खायचं काम नाही. आयसीसीने शेड्यूल जाहीर केलं असून आजच म्हणजेच बुधवारी तिकिटं बुक करण्याच्या तारखांचीही घोषणा केली आहे. मात्र अशातच वर्ल्ड कप अगोदर एक मोठं विघ्न आलं आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या मैदानांमधील एका स्टेडियममध्ये आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
कोलकातामधील ईडन गार्डन या स्टेडियममध्ये बुधवारी 11. 50 च्या सुमारास आग लागली होती. या आगीमध्ये संपूर्ण ड्रेसिंग रूम जळून खाक झालं आहे. ड्रेसिंग रूममध्ये ठेवलेलं बरेचसं सामानही आगीमध्ये जळालं आहे. अग्निशमन विभागातील जवानांना आग आटोक्यात आणण्यासाठी जवळपास एक तास लागला. ही आग आणखी वाढत गेली असती मात्र वेळीच आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आल्याने मोठा अनर्थ टळला. वर्ल्ड कपच्या अगोदर अशी घटनास होणं विचित्र मानलं जात आहे. ड्रेसिंग रूमच्या फॉल्स सिलिंगमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती समजत आहे.
क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल (सीएबी) चे सचिव देबब्रत दास आग लागलेल्या ठिकाणी पोहोचले आणि पाहणी केली. कर्मचाऱ्याच्या चूकीने तर नाही ना आग लागली याची चौकशी करण्यात येणार असल्याचं देबब्रत दास यांनी सांगितलं.
दरम्यान, कोलकातामधील ई़डन गार्डन हे जगप्रसिद्ध स्टेडियम आहे. या मैदानावर अनेक आंतरराष्ट्रीय सामने खेळवले जातात. यंदाच्या वर्ल्ड कपमधील इंग्लंड-पाकिस्तान आणि भारत-दक्षिण आफ्रिका या मोठ्या संघांचे सामने खेळवले जाणार आहेत. यासह सेमी फायनल 2 चा सामनाही या मैदानावर रंगणार आहे.
दरम्यान, ईडन गार्डनवरील मैदानावर वर्ल्ड कपचा पहिला सामना 28 ऑक्टोबरला नेदरलँड आणि बांगलादेश या संघामध्ये होणार आहे. तर दुसरा सामना पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये 31 क्टोबरला होणार आहे.