टी20 वर्ल्डकप स्पर्धा अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होत आहे. यासाठी 20 संघ सज्ज असून जेतेपदासाठी 1 जूनपासून लढत सुरु होईल. या स्पर्धेतील अंतिम फेरीचा सामना 29 जूनला असणार आहे. तत्पूर्वी टी20 वर्ल्डकपसाठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली आहे. न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडनंतर भारताने संघ जाहीर केला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात 15 खेळाडूंची नाव जगजाहीर केली आहेत. या संघात कोणाला स्थान मिळणार याची चर्चा रंगली होती. मात्र या चर्चांना आता पूर्णविराम लागला आहे. टीम इंडियाची घोषणा केली असून काही नावं नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. तर काही नावांच्या समावेशामुळे आता वेगळीच चर्चा रंगली आहे. टीम इंडियाच्या निवडीनंतर खासकरून पाच मुद्द्यांवर चर्चा होताना दिसत आहे. चला जाणून घेऊयात या निर्णयांबाबात
पहिली घडामोड : आयपीएल 2023 स्पर्धेत सलग पाच षटकार मारत रिंकू सिंह चर्चेत आला होता. त्यानंतर त्याला टीम इंडियात खेळण्याची संधी मिळाली. मात्र यंदाच्या टी20 वर्ल्डकपमध्ये त्याला स्थान मिळालेलं नाही. बीसीसीआय निवड समितीने रिंकू सिंह ऐवजी शिवम दुबेवर विश्वास दाखवला आहे.
दुसरी घडामोड : लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार आणि विकेटकीपर बॅट्समन केएल राहुलची बॅट आयपीएलमध्ये चांगलीच तळपली आहे. त्यामुळे त्याला संघात स्थान मिळेल अशी चर्चा होती. मात्र त्याला डावलण्यात आलं आहे. इतकंच काय तर त्याला राखीव खेळाडूमध्येही स्थान मिळालेलं नाही.
तिसरी घडामोड : संजू सॅमसनला संघात स्थान मिळणार की नाही याची चर्चा रंगली होती. गेल्या काही वर्षांपासून टीम इंडियात आत बाहेर होत आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमी बीसीसीआयवर राग व्यक्त करत होते. मात्र संजू सॅमसनने आयपीएल स्पर्धेत स्वत:ला सिद्ध केलं असून संघात स्थान मिळवलं आहे.
चौथी घडामोड : फिरकीपटूच्या रेसमध्ये तीन नावांची चर्चा होती. कुलदीप यादव, युझवेंद्र चहल आणि रवि बिष्णोई यांची नावं आघाडीवर होती. चहलला संधी मिळेल की नाही याबाबत साशंकता होती. मात्र 8 महिन्यानंतर चहलने संघात स्थान मिळवलं आहे. तर बिष्णोईचा पत्ता कापला गेला आहे.
पाचवी घडामोड : टी20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियाच्या उपकर्णधारपदाची धुरा कोणाच्या खांद्यावर असेल याची चर्चा रंगली होती. त्यावरही आता पडदा पडला आहे. हार्दिक पांड्याकडे टीम इंडियाचं उपकर्णधारपद असणार आहे.