वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीसाठी भारतासह पाच संघ दावेदार, कसं आहे समीकरण जाणून घ्या

| Updated on: Oct 28, 2024 | 9:45 PM

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेची चुरस आता वाढली आहे. भारताने न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका 2-0 ने गमावली आहे. आता तिसरा सामना औपचारिक असला तरी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेवर परिणाम करणारा आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या शर्यतीत एकूण पाच संघ आहेत. कोणाला किती संधी ते जाणून घेऊयात.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीसाठी भारतासह पाच संघ दावेदार, कसं आहे समीकरण जाणून घ्या
Follow us on

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी एकूण 9 संघात चुरस होती. त्यापैकी चार संघ आता स्पर्धेतून आऊट झाले आहेत. पाकिस्तान, इंग्लंड, बांग्लादेश आणि वेस्ट इंडिज यांचं आव्हान संपुष्टात आलं आहे. तर भारत, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, न्यूजीलंड आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात चुरशीची लढाई असणार आहे. त्यामुळे या पाच संघांपैकी टॉप 2 मध्ये कोणता संघ बाजी मारतो याकडे लक्ष लागून आहे. त्यामुळे पुढे जाऊन या पाच संघात जबरदस्त चुरस पाहायला मिळणार आहे. भारताला अजून सहा सामने खेळायचे आहेत. त्यापैकी चार सामन्यात विजय मिळवला तर अंतिम फेरीतील स्थान पक्कं होईल. पण काही गडबड झाली तर मात्र इतर संघांच्या कामगिरीवर अवलंबून राहावं लागणार आहे. भारताचा एक सामना न्यूझीलंड आणि उर्वरित पाच सामने ऑस्ट्रेलियाविरुद्ध आहे. भारताने सहा सामने जिंकले तर विजयी टक्केवारी 62.82 वरून 74.56 वर जाईल.

ऑस्ट्रेलियाही अंतिम फेरीसाठी प्रमुख दावेदार आहे. ऑस्ट्रेलियाला अजून 7 सामने खेळायचे आहेत. पाच सामने भारताविरुद्ध आणि दोन सामने श्रीलंकेविरुद्ध खेळायचे आहेत. सातच्या सात सामने जिंकले तर विजयी टक्केवारी 62.50 वरून 76.32 वर जाईल. त्यामुळे भारताला सर्वाधिक भिती ही ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेची आहे.

श्रीलंका सध्या गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर असून विजयी टक्केवारी 55.56 इतकी आहे. श्रीलंकेला अजून चार सामने खेळायचे आहेत. यात दक्षिण अफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया हे संघ आहेत. श्रीलंकेने चारही सामने जिंकले तर विजयी टक्केवारी 69.23 इतकी होईल.

न्यूझीलंडही सध्या अंतिम फेरीच्या शर्यतीत आहे. न्यूझीलंडला एकूण चार सामने खेळायचे आहेत. चार पैकी एक सामना भारतासोबत आणि तीन सामने इंग्लंडविरुद्ध खेळायचे आहेत. न्यूझीलंडने चारही सामने जिंकले तर विजयी टक्केवारी ही 64.29 इतकी होईल. सध्या न्यूझीलंडची विजयी टक्केवारी ही 50 असून चौथ्या स्थानावर आहे.

दक्षिण अफ्रिका पाचव्या स्थानावर असून विजयी टक्केवारी ही 47.62 इतकी आहे. दक्षिण अफ्रिकेचे पाच सामने शिल्लक आहेत. एक बांग्लादेश, दोन श्रीलंका, दोन पाकिस्तानसोबत खेळायचे आहेत. श्रीलंकने पाचही सामन्यात विजय मिळवला तर विजयी टक्केवारी 69.44 टक्के इतकी होईल.