मुंबई : भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह याची दुखापत भारतीय संघासाठी डोकेदुखीचं ठरताना दिसत आहे. सप्टेंबर महिन्यापासून बुमराह संघाबाहेर असून त्याने अनेकदा संघात येण्याचा प्रयत्न केला. मात्र पाठीच्या दुखापतीतून त्याची काही सुटका होताना दिसत नाही. आशिया कप आणि टी-20 वर्ल्ड कप सारख्या महत्त्वाच्या स्पर्धांना त्याला दुखण्यामुळे मुकावं लागलं. आता जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमधूनही बाहेर पडला जाण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर भारताच्या माजी खेळाडूने आता बुमराहला आता विसरून जा असं म्हणत संघातील एका बॉलरला संधी देण्याचा सल्ला दिला आहे.
कसोटी चॅम्पियनशिपला इंग्लंडमध्ये तुम्हाला किमान 3 वेगवान गोलंदाजांची गरज आहे, त्यामुळे फक्त एक स्पिनर खेळू शकतो आणि बाकीचे वेगवान गोलंदाज असतील. त्यामुळे आता बुमराहला विसरा आणि उमेश यादव याला संधी द्या. बुमराह येईल तेव्हा येईल त्याची नेमकी येण्याची काहीच शाश्वती नाही. कदाचित त्याला दुखपातीमधून सावरायला आणखी एक ते दीड वर्ष लागू शकतं, असं मदन लाल यांनी म्हटलं आहे.
एखादी दुखापत बरी होण्यासाठी 3 महिने लागतात मात्र बुमराह गेल्या वर्षभरापासून क्रिकेटपासून लांब आहे. हार्दिक पांड्या 4 महिन्यांच्या आत परतला मात्र बुमराह खूप दिवस झालं बाहेर आहे. त्यामुळे तो पुनरागमन करणार आणि पहिल्यासारख्या फॉर्ममध्ये दिसेल, अशी आशा आपण कशी काय करू शकतो. त्याला पहिल्यासारखं पाहायचं असेल तर पुरेसा वेळ दिला पाहिजे असल्याचं मदन लाल म्हणाले. जर भारत डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरला तर टीम इंडियाने त्याला संघात सामील करून घ्यावं, असा सल्ला मदन लाल यांनी दिलाय.
दरम्यान, उमेश यादवने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात तीन बळी घेतले. तिसर्या कसोटीतील खेळपट्टी फिरकीपटूंना पूर्ण साथ देणारी होती, पण उमेश यादवने काही कांगारू फलंदाजांना गुडघे टेकवायला भाग पाडलं होतं.