भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका 22 नोव्हेंबरपासून सुरु होत आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-2025 या साखळीतील ही शेवटची कसोटी मालिका आहे. भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम फेरी गाठण्यासाठी ही मालिका काहीही करून 4-0 ने जिंकणं भाग आहे. तरंच भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम फेरी गाठू शकतो. मात्र ऑस्ट्रेलियात असा विजय अशक्य आहे असं मत टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी व्यक्त केलं आहे. एका खासगी वाहिनीवरील चर्चेत बोलताना सुनील गावसकर म्हणाले की, भारतीय संघाला ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलियाला 4-0 ने पराभूत करणे अशक्य आहे. त्यामुळे अशा विजयासह जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्याचे स्वप्न पाहणं चुकीचं ठरेल. त्यापेक्षा ऑस्ट्रेलियात मालिका जिंकण्याचा प्रयत्न करावा.
टीम इंडियाने 4-0 ने संभाव्य विजयाचा दावा करण्याची त्यांची इच्छा सोडली पाहिजे. अशा विजयाची अपेक्षा बाजूला ठेवून दोन-तीन सामने जिंकणे ही उल्लेखनीय कामगिरी ठरेल. टीम इंडियाने मालिका जिंकण्यावर अधिक लक्ष केंद्रित करायला हवे, असे सुनील गावस्कर यांनी पुढे सांगितलं. त्यामुळे पहिल्याच सामन्यात टीम इंडिया कशी कामगिरी करते याकडे लक्ष लागून आहे. रोहित शर्मा पहिल्याच सामन्यात अनुपस्थित आहे. त्यामुळे कर्णधारपदाची धुरा जसप्रीत बुमराहच्या खांद्यावर आहे. त्यामुळे पहिल्याच सामन्यात विजय मिळवणं आव्हान असणार आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीचं गणित खूपच कठीण आहे. कदाचित तिसऱ्यांदा अंतिम फेरी गाठण्याचं स्वप्न भंगू शकतं. भारताने ऑस्ट्रेलियाचा 5-0 किंवा 4-0 ने पराभव केला तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल निश्चित होईल. पण या मालिकेत टीम इंडियाचा एकही पराभव परवडणारानाही. म्हणजे 5 सामन्यांच्या मालिकेत 4 विजय आणि 1 अनिर्णित राहणे अपरिहार्य आहे.
टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका 3-2 अशा फरकाने जिंकली, तर इतर दोन्ही संघांमधील निकाल निर्णायक असेल. म्हणजे इथे इंग्लंडने न्यूझीलंडविरुद्ध 1 कसोटी सामना जिंकला पाहिजे. तसेच श्रीलंकेची ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी अनिर्णित राहिली पाहीजे. तरच टीम इंडियाचं अंतिम फेरीचं गणित ठरेल.