आयपीएल 2024 स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु साखळी फेरीत जबरदस्त कामगिरी केली. कोणलाही विश्वास बसणार नाही असं कमबॅक केलं. इतकंच काय तर चेन्नई सुपर किंग्सला पराभूत करत नेट रनरेटचं गणित सोडवलं आणि एलिमिनेटर फेरीत स्थान मिळवलं. पण एलिमिनेटर फेरीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची निराशाजनक कामगिरी राहिली. अंतिम फेरीत कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे संघ आमनेसामने आले होते आणि कोलकात्याने बाजी मारली. या सामन्यानंतर ऑरेंज कॅपचा मान विराट कोहलीला मिळाला. कारण त्याच्या इतपत धावांची मजल कोणी मारली नाही. असं असताना चेन्नई सुपर किंग्सचा माजी फलंदाज अंबाती रायुडू याला आयतं कोलित हाती मिळालं आहे. फक्त ऑरेंज कॅप जिंकून आयपीएल ट्रॉफी मिळत नाही. यासाठी सर्व खेळाडूंनी योगदान दिलं पाहीजे, असं ट्वीट अंबाती रायुडू याने केलं आहे. आयपीएल साखळी फेरीच्या शेवटच्या सामन्यात बंगळुरुने चेन्नईचा धुव्वा उडवला आणि जोरदार सेलिब्रेशन केलं होतं. या सेलिब्रेशनमुळे अंबाती रायुडू संतापला होता. तेव्हापासून त्याचं विराट कोहलीवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या टीकास्त्र सुरु आहे.
केकेआरने ट्रॉफी जिंकल्यानंतर स्टार स्पोर्ट्सवरील संभाषणात बोलताना त्याने ऑरेंज कॅपचा उल्लेख करत अप्रत्यक्षरित्या विराट कोहलीवर निशाणा साधला. “केकेआर संघासाठी आंद्रे रसेल, सुनील नरेन, मिचेल स्टार्क या अनुभवी खेळाडूंनी मोठे योगदान दिले आहे. सर्वांनी सहकार्य केले नाही तर संघ आयपीएल ट्रॉफी कशी जिंकू शकतात? ऑरेंज कॅप जिंकून तुम्ही आयपीएल जिंकू शकत नाही. पण, सर्व खेळाडूंना एकत्रित कामगिरी करावी लागेल.”, असं अंबाती रायुडू म्हणाला.
'Orange Cap doesn't win you IPL'
~ Ambati Rayudu
— Cricketopia (@CricketopiaCom) May 27, 2024
एलिमिनेटर फेरीत आरसीबीचा पराभव झाल्यानंतर अंबाती रायुडूने आरसीबी आणि विराट कोहलीवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. आरसीबीच्या पराभवानंतर त्याने एक पोस्ट केली होती. “आरसीबी समर्थकांचे आभार. गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने संघाला सपोर्ट करत आहेत. संघ व्यवस्थापन आणि नेत्यांनी वैयक्तिक आकडेवारीऐवजी संघाच्या हितावर लक्ष केंद्रित केले असते तर ही परिस्थिती उद्भवली नसती. आरसीबीने 17 वर्षांपासून जेतेपद जिंकलेले नाही. संघाने किती महान खेळाडू मागे सोडले ते लक्षात ठेवा. संघाच्या हितासाठी अशा खेळाडूंना परत आणण्यासाठी तुम्ही तुमच्या संघावर दबाव आणला पाहिजे. मेगा लिलावाने नवा अध्याय सुरू झाला पाहिजे,” अशी पोस्ट अंबाती रायुडूने केली होती.
My heart truly goes out to all the rcb supporters who have passionately supported the team over the years. If only the management and the leaders had the teams interests ahead of individual milestones .. rcb would have won multiple titles. Just remember how many fantastic players…
— ATR (@RayuduAmbati) May 24, 2024
2025 मेगा लिलावाकडे आता सर्वांचं लक्ष लागून आहे. आयपीएलचं 18वं पर्व आहे. आता ऱॉयल चॅलेंजर्स बंगळुरु कोणत्या चार खेळाडूंना रिटेन इतरांना रिलीज करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच लिलावात गोलंदाजांची उणीव कशी भरून काढणार याकडेही लक्ष लागून आहे. नाही तर 18 व्या पर्वातही आरसीबीची झोळी रिती राहू शकते.