कोलकातामधील आरजी कर मेडिकल कॉलेजमध्ये एका ज्यूनियर डॉक्टरची बलात्कार करून हत्या केली गेली होती. या घटनेने सर्व देश हादरून गेला आहे. सरकारकडून ठोस कारवाई होत नसल्याने पीडित तरूणीला न्याय मिळवून देण्यासाठी देशभरातील डॉक्टर रस्त्यावर उतरले आहेत. विद्यार्थी, राजकीय पक्षांसह बॉलिवुड आणि क्रीडा क्षेत्रातील सेलिब्रिटींनीही आवाज उठवण्यास सुरूवात केली आहे. अशातच भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंह याने बंगालच्या ममता सरकार आणि सीबीआयकडे याप्रकरणी कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
महिलांच्या सुरक्षा आणि प्रतिष्ठेशी तडजोड केली जाऊ शकत नाही. या गुन्ह्यातील गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे. तरच व्यवस्थेवर सर्वांना विश्वास बसू शकतो आणि अशी दुर्घटना पुन्हा घडणार नाही याची काळजी घेऊ शकतो. त्यासोबतच आपण असा समाज तयार करू जिथे महिलांना सुरक्षित वाटेल. आपण स्वत:लाच विचारलं पाहिजे की आता नाही तर कधीच नाही. मला वाटतं आता कारवाईची वेळ आली आहे, असं हरभजन सिंह याने म्हटलं आहे.
हिंसेच्या या अकल्पनीय कृत्याने आपल्या सर्वांनाच धक्का बसला आहे. हा केवळ एका महिलेविरूद्ध घडलेला गुन्हा नाहीतर समाजातील प्रत्येक स्त्रिच्या प्रतिष्ठेवर आणि सुरक्षेवर केलेला गंभीर हल्ला आहे. हे आपल्या समाजात खोलवर रुजलेल्या समस्यांचे प्रतिबिंब आहे. अशी घटना एका वैद्यकीय संस्थेच्या आवारात घडली, जी उपचार आणि जीव वाचवण्यासाठी समर्पित ठिकाण आहे. हे अत्यंत धक्कादायक आणि अस्वीकार्य आहे. एक आठवड्याहून अधिक काळ लोटला आहे आणि अद्याप कोणतीही ठोस कारवाई दिसत नाही. ज्यामुळे डॉक्टर आणि वैद्यकीय समुदाय रस्त्यावर उतरले आहेत. वैद्यकीय समुदाय आधीच आव्हानात्मक परिस्थितीत काम करत आहे. अशा घटनांनंतर त्यांची कर्तव्ये समर्पणाने पार पाडावीत अशी अपेक्षा आपण कशी करू शकतो, जेव्हा त्यांच्या स्वतःच्या सुरक्षेला इतका गंभीर धोका असतो, असंही हरभजन सिंह म्हणाला.
हरभजन सिंह आधी टीम इंडियाचे खेळाडू जसप्रीत बुमराह, श्रेयस अय्यर, मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग यांनी संताप व्यक्त केला होता. सोशल मीडियावर पोस्ट करत आवाज उठवण्याची मागणी केली होती.