टीम इंडियाचा क्रिकेटर हार्दिक पंड्या याचा सध्या पडता काळ सुरु आहे. हार्दिकला चारही बाजूने टीका आणि अडचणींचा ‘सामना’ करावा लागत आहे. हार्दिकला आयपीएलच्या 17 व्या मोसमात आधी कॅप्टन्सी आणि त्यानंतर कामगिरीवरुन जोरदार टीका सहन करावी लागली. त्यांनतर आता आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धा तोंडावर असताना त्याच्या वैवाहिक आयुष्यात तुफान उठल्याची चर्चा रंगली आहे. हार्दिकची आणि त्याची पत्नी अभिनेत्री नताशा स्टेन्कोविक या दोघांमध्ये फिस्कटल्याने घटस्फोट झाल्याची चर्चा आहे. याबाबत दोघांनी अद्याप भाष्य केलेलं नाही. मात्र टी 20 वर्ल्ड कपच्या तोंडावर हार्दिकसोबत असं होणं ही भारतीय क्रिकेटसाठी चांगली लक्षणं नाहीत. अशात आता टीम इंडियाचा माजी क्रिकेटर हरभजन सिंह हा हार्दिक पंड्याच्या मदतीला धावून आला आहे. हरभजनने हार्दिकची हिंमत वाढवण्याचा प्रयत्न केला आहे.
टी 20 वर्ल्ड कप दरम्यान सर्वकाही बदलेल अशी हरभजनला आशा आहे. हरभजन पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत बरंच काही बोलून गेला. “जेव्हा तो (हार्दिकला उद्देशून) निळ्या अर्थात टीम इंडियाच्या जर्सीसह उतरेल तेव्हा वेगळा हार्दिक पाहायला मिळेल, कारण आपल्याला माहितीय की तो धावा करु शकतो आणि विकेट घेऊ शकतो. हार्दिकने चांगली कामगिरी करावी, कारण त्याने आतापर्यंत खूप काही सहन केलं आहे. तसेच हार्दिकला मी टीम इंडियाच्या महत्त्वाच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा देतो”, असं हरभजनने म्हटलं.
“हार्दिकने टी 20 वर्ल्ड कपमध्ये चमकदार कामगिरी केली, तर टीम इंडियाला या स्पर्धेत पुढे जाण्याची सुवर्ण संधी असेल, असा विश्वास हरभजनने व्यक्त केला. हार्दिकची कामगिरी चिंताजनक विषय आहे. हार्दिकच्या आजूबाजूला फार काही घडत होतं. हार्दिकचं गुजरात टायटन्समधून मुंबई इंडियन्समध्ये येणं एक मोठा बदल होता. तसेच मुंबईचा कॅप्टन म्हणून हार्दिकबाबत सकारात्मकता नव्हती”, असंही हरभजनने नमूद केलं. हरभजनने ‘पीटीआय भाषा’ला दिलेल्या मुलाखतीत असं म्हटलं.
टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल , अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
राखीव खेळाडू : शुबमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद आणि आवेश खान