टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर 8 फेरीत भारताने अफगाणिस्तानचा 47 धावांनी धुव्वा उडवला. त्यामुळे भारताचा उपांत्य फेरीचा मार्ग सुकर झाला आहे. या सामन्यात जसप्रीत बुमराह आणि सूर्यकुमार यादव यांनी चांगली कामगिरी केली. आता भारताने बांगलादेशविरुद्धचा सामना जिंकला की उपांत्य फेरीतील स्थान पक्कं होईल. अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी सूर्यकुमार यादव पत्रकार परिषदेला सामोरा गेला होता. सामन्यानंतर पत्रकार परिषदेतील एक क्लिप आता व्हायरल होत आहे. पत्रकाराने सूर्यकुमार यादव याचा उल्लेख मोहम्मद सिराज असा केला. तेव्हा सूर्याने क्षणाचाही विलंब न करता या क्षणाचा आनंद घेत हसत उत्तर दिलं. “सिराज तर नाही. सिराज भाई जेवण करत आहे.” त्याच्या या उत्तरानंतर संघाची आत्मविश्वासपूर्ण मानसिकता प्रतिबिंबित झाली होती.
आयसीसीने या पत्रकार परिषदेतला व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ पोस्ट करताना लिहिलं आहे की, “गलती से मिस्टेक, हो गया सूर्या भाई.” सूर्यकुमार यादवने अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात वादळी खेळी केली. 28 चेंडूत तीन षटकार आणि 5 चौकारांच्या मदतीने 53 धावा केल्या. त्याच्या या खेळीमुळे टीम इंडियाला 181 धावापर्यंत मजल मारता आली.
अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात जसप्रीत बुमराहची जादू पुन्हा दिसली. त्याने 4 षटकात फक्त 7 धावा देत तीन गडी बाद केले. तसेच एक निर्धाव षटकही टाकलं. त्याच्या या स्पेलमुळे अफगाणिस्तानचा डाव 134 धावांवरच आटोपला. भारताचा सुपर 8 फेरीतील पुढचा सामना आता बांगलादेशशी आहे. 22 जूनला सर विवियन रिचर्ड स्टेडियममध्ये हा सामना रंगणार आहे. या खेळपट्टीवर धावांचा पाठलाग करणं सोपं ठरेल असं दिसतंय. त्यामुळे नाणेफेकीचा कौल महत्त्वाचा ठरेल.
भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, यशस्वी जयस्वाल, कुलदीप यादव, संजू सॅमसन , युझवेंद्र चहल.
बांगलादेश संघ: तन्झिद हसन, लिटन दास (विकेटकीपर), नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), शकीब अल हसन, तौहिद ह्रिदोय, महमुदुल्ला, जाकेर अली, तन्झिम हसन साकिब, रिशाद हुसेन, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान, महेदी हसन, तन्वीर इस्लाम, शरीफुल इस्लाम, सौम्या सरकार.