पाकिस्तान क्रिकेटमध्ये गेल्या काही महिन्यात बरंच काही घडताना दिसत आहे. दरम्यान, इंग्लंडविरुद्ध पहिला कसोटी सामना गमावल्यानंतर पाकिस्तानने कमबॅक केलं. तसेच तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत इंग्लंडला 2-1 ने पराभूत केलं. कसोटी सामन्यात सर्वकाही ट्रॅकवर येत असताना अचानक मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये उलथापालथ होताना दिसत आहे. प्रशिक्षक गॅरी कर्स्टन याने आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. कर्स्टनचे पीसीबी आणि काही खेळाडूंशी मदभेद होते. त्यामुळे त्यांना तात्काळ राजीनामा दिला. पाकिस्तान संघ 4 नोव्हेंबरपासून ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. तीन सामन्यांची वनडे आणि टी20 मालिका खेळणार आहे. पण पाकिस्तान संघासोबत गॅरी कर्स्टन नसणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डानेही गॅरी कर्स्टन यांचा राजीनामा स्वीकारला असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे गॅरी कर्स्टन यांनी अवघ्या सहा महिन्यात हे पद सोडलं आहे.
गॅरी कर्स्टन आणि खेळाडूंमध्ये कायम वाद होत होते. काही खेळाडूंनी याची तक्रार पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडेही केली होती. त्यामुळे गॅरी कर्स्टन यांच्यावर चोहीबाजूने दबाव वाढला होता. पाकिस्तान चॅनेल जिओ न्यूजच्या पत्रकाराने दावा केली की, गॅरी कर्स्टनला पीसीबी काढणार होती. त्यामुळे त्याच्याविरोधात एक षडयंत्र रचलं गेलं. त्यामुळे त्यांनी स्वत:च आपल्या पदाचा राजीनामा दिला. रिपोर्टनुसार, पीसीबीने दिलेला शब्द न पाळल्याने गॅरी कर्स्टन नाराज होता. पीसीबीने कर्स्टनला निवड समितीत खेळाडू निवडण्याचा अधिकार दिला जाईल असं आश्वासन दिलं होतं. पण हा शब्द पीसीबीने पाळला नाही.
गॅरी कर्स्टन यांनी झिम्बाब्वे आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी खूप काही योजना आखली होती. पण पीसीबीने आपल्या आवडीचे खेळाडू निवडले. त्यामुळे कर्स्टन नाराज झाला आणि आपल्या पदाचा राजीनामा दिला. कर्स्टनने यापूर्वी अनेक संघांच्या प्रशिक्षकपदाची भूमिका बजावली आहे. 2011 मध्ये टीम इंडियासाठी वर्ल्डकप जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. दक्षिण अफ्रिकेलाही कोचिंग दिलं आहे. आयपीएलमध्येही त्याने आपला अनुभव शेअर केला आहे. त्यामुळे कर्स्टनचा नावलौकिक मोठा आहे. असं असूनही पाकिस्तान बोर्डाने कर्स्टन यांना पायउतार करण्यासाठी डिवचण्याची एकही संधी सोडली नाही.