आयपीएल 2024 स्पर्धेत गौतम गंभीरच्या नावाची जोरदार चर्चा रंगली. त्याच्या मार्गदर्शनाखाली कोलकाता नाईट रायडर्स संघाने दहा वर्षानंतर जेतेपदावर नाव कोरलं. पण या वर्षी गौतम गंभीरकडून कोणताही वादाचं कारण समोर आलं नाही. गौतम गंभीर डगआऊटमधून शांतपणे संघाच्या जडणघडणीत मोलाची साथ देत होता. इतकंच काय तर गौतम गंभीर आणि विराट कोहली एका सामन्यानिमित्त पुन्हा आमनेसामने आले होते. आरसीबी विरुद्ध केकेआर सामन्यात दोघं एकमेकांसमोर उभे ठाकले होते. त्यामुळे या दोघांमध्ये पुन्हा एकदा वाद होईल अशी चर्चा रंगली होती. मात्र तसं काही झालं नाही. उलट दोघांनी एकमेकांशी चर्चा केली आणि भर मैदानात मिठी मारत ‘त्या’ बातम्यांना तिलांजली दिली. आता गौतम गंभीर टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी विराजमान होणार या चर्चांना जोर धरू लागला आहे. त्यामुळे विराट-गंभीर पुन्हा एकदा एकत्र दिसू शकतात. असं असताना गौतम गंभीरने विराट कोहलीबाबत असलेल्या नात्यावर पडदा दूर केला आहे.
“विराट कोहलीशी माझे नाते असे आहे ते या देशाला माहित असण्याची गरज नाही. त्याला त्याच्या संघाला विजय मिळवून देण्याचा माझ्याइतकाच अधिकार आहे. आमचे काम लोकांना विषय चघळत बसण्यासाठी मसाले देणं नाही.”, असं गौतम गंभीरने स्पष्टपणे सांगितलं. एका मुलाखतीत विराट कोहलीबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना गंभीरने स्पष्टीकरण दिलं. “आमचे नाते तुम्हा सर्वांना माहिती असलेल्या वास्तवापासून खूप दूर आहे. काही जणांनी विराट कोहलीसोबतच्या माझ्या नात्यात मसाला टाकला. खूप बातम्या तयार झाल्या. पण आम्ही दोघेही तसे नाही.”, असंही गंभीर पुढे म्हणाला.
गौतम गंभीर आणि विराट कोहली यांच्यात आयपीएलमध्ये अनेकदा भांडण झालं आहे. मागच्या पर्वातही गौतम गंभीर लखनौ सुपर जायंट्सचा मेंटॉर असताना आणि विराट कोहली हा वाद पेटला होता. मात्र या पर्वात दोघांनी भर मैदानात तसं काही झालं नसल्याचं दाखवून दिलं. आता गौतम गंभीर टी20 वर्ल्डकप स्पर्धेनंतर टीम इंडियाचा प्रशिक्षक असेल अशी जोरदार चर्चा रंगली आहे. असं असताना एकाच छताखाली विराट कोहली आणि गौतम गंभीर कशी कामगिरी करतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.