गौतम गंभीरची ‘ती’ मागणी बीसीसीआयने फेटाळली! फिल्डिंग कोच म्हणून आता…

| Updated on: Jul 11, 2024 | 10:38 PM

टी20 वर्ल्डकप स्पर्धेनंतर टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठी उलथापालथ झाली आहे. राहुल द्रविडच्या जागी गौतम गंभीर याची हेड कोच म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर सपोर्ट स्टाफही बदलला जाणार आहे. मात्र बीसीसीआयने फिल्डिंग कोचबाबत वेगळी भूमिका घेतल्याची चर्चा आहे.

गौतम गंभीरची ती मागणी बीसीसीआयने फेटाळली! फिल्डिंग कोच म्हणून आता...
Gautam_Gambhir
Follow us on

बीसीसीआयने टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी गौतम गंभीर याची नियुक्ती केली आहे. आता गौतम गंभीरसोबत सपोर्ट स्टाफमध्ये कोण असेल याची चर्चा रंगली आहे. राहुल द्रविडसोबत बॅटिंग कोच म्हणून विक्रम राठोड, बॉलिंग कोच म्हणून पारस म्हाम्ब्रे, तर फिल्डिंग कोच म्हणून टी दिलीप होते. या सर्वांचा कार्यकाळ राहुल द्रविडसोबत संपला आहे. आता या पदांसाठी नवीन सदस्य नियुक्त केले जातील. श्रीलंका दौऱ्यापासून नवीन स्टाफ कार्यरत होणार आहे. तसं पाहिलं तर बीसीसीआय हेड कोचला सपोर्ट स्टाफ निवडण्याची मुभा देते. गंभीरच्या बाबतीत काही वेगळं चित्र नाही. पण गौतम गंभीरची बॉलिंग कोच आणि फिल्डिंग कोचची मागणी बीसीसीआयने फेटाळल्याची चर्चा रंगली आहे. गंभीरने बॉलिंग कोचसाठी विनय कुमारचं नाव सुचवलं होतं. मात्र बीसीसीआयने या नावाला लाल कंदील दाखवल्याचं सांगण्यात येत आहे.

हिंदुस्तान टाईम्सला बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गौतम गंभीरने फिल्डिंग कोच म्हणून जॉन्टी रोड्सच्या नाव सूचवलं होतं. पण त्याची ही मागणी बीसीसीआयने फेटाळल्याची सांगण्यात येत आहे. जॉन्टी रोड्सच्या क्षमतेबाबत तसा काहीच प्रश्न नाही. तो एक सर्वोत्तम क्षेत्ररक्षक आहे यात शंका नाही. आयपीएलमध्ये लखनौ सुपर जायंट्सचा तो फिल्डिंग कोचही आहे. मात्र बीसीसीआय सपोर्ट स्टाफमध्ये विदेशी व्यक्ती घेण्यास उत्सुक नाही. गेल्या सात वर्षांपासून टीम इंडियात सर्व सपोर्ट स्टाफ भारतीय आहे. त्यात बीसीसीआय काय बदल करू इच्छित नाही.

भारतीय सपोर्ट स्टाफ असावा अशी मागणी असल्याने टी दिलीप यांच्यासाठी पुन्हा एकदा कोचिंगचे दरवाजे उघडले आहेत. त्यांच्या कार्यकाळात टीम इंडियाने फिल्डिंगमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे मुख्य प्रशिक्षकासह मागच्या स्टाफमधील सदस्य कार्यरत ठेवण्यास हरकत नसेल. यापूर्वीही असं घडलं आहे. 2019 वनडे वर्ल्डकपनंतर संजय बांगर याच्या जागी विक्रम राठोर सपोर्ट स्टाफमध्ये आला. रवि शास्त्रीच्या नेतृत्वात त्याने भूमिका बजावली. त्यानंतर द्रविडच्या कार्यकाळात राठोरच या पदावर कायम राहिला. त्यामुळे टी दिलीपच्या बाबतीत असं होऊ शकतं.