गौतम गंभीरच्या कार्यकाळात दोन कर्णधारांचं पर्व! श्रीलंका दौऱ्यात अशी असेल जबाबदारी

| Updated on: Jul 10, 2024 | 10:53 PM

गौतम गंभीरची टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी निवड झाली आहे. त्याचा हा कार्यकाळ श्रीलंका दौऱ्यापासून सुरु होणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया सुरुवातीला टी20 मालिका आणि त्यानंतर वनडे मालिका खेळणार आहे. या दोन्ही मालिकांसाठी वेगवेगळे कर्णधार असणार आहेत.

गौतम गंभीरच्या कार्यकाळात दोन कर्णधारांचं पर्व! श्रीलंका दौऱ्यात अशी असेल जबाबदारी
Follow us on

गौतम गंभीरने प्रशिक्षकपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर बदलाचे वारे वाहू लागले आहेत. राहुल द्रविड याचा कार्यकाळ संपल्यानंतर या पदावर गौतम गंभीरची नियुक्ती करण्यात आली आहे. संघात बरेच बदल होतील असं आतापासून दिसू लागलं आहे. टी20 फॉर्मेटमधून रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनी निवृत्ती जाहीर केल्याने आपसूक या जागांसाठी नव्या खेळाडूंचा विचार होईल. या जागी कोण फिट बसेल याची चाचपणी आतापासूनच केली जात आहे. दरम्यान भारतीय संघात दोन कर्णधारांचं पर्व सुरु होईल असं दिसत आहे. प्रशिक्षपदाच्या कार्यकाळात टीम इंडिया दोन कर्णधारांसह मैदानात उतरणार आहे. हार्दिक पांड्या आणि केएल राहुल यांच्यावर ही जबाबदारी असणार आहे. टीम इंडिया 27 जुलैपासून श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात पहिल्यांदा तीन सामन्यांची टी20 मालिका आणि त्यानंतर वनडे मालिका खेळेल.

न्यूज एजेंसी एएनआयच्या रिपोर्टनुसार, टी20 वर्ल्डकप स्पर्धेत ब्रेक घेतलेल्या खेळाडूंचं श्रीलंका दौऱ्यापासून पुनरागमन होईल. फक्त जसप्रीत बुमराह वगळता इतर खेळाडू पुनरागमन करतील. जसप्रीत बुमराहला या दौऱ्यात नसेल. टी20 वर्ल्डकप स्पर्धेत उपकर्णधार असलेला हार्दिक पांड्या या मालिकेतून पुनरागमन करेल. इतकंच काय तर टी20 संघाची धुरा त्याच्या खांद्यावर असेल. या मालिकेपासून हार्दिक पांड्या टी20 संघाचा कायमस्वरुपी कर्णधार असेल. तर वनडे फॉर्मेटसाठी केएल राहुलच्या नावाचा विचार आहे.

बीसीसीआय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत केएल राहुलच्या खांद्यावर कर्णधारपदाची धुरा असेल. केएल राहुलने यापूर्वी टीम इंडियाचं कर्णधारपद भूषवलं आहे. केएल राहुल वनडे वर्ल्डकप 2023 नंतर या फॉर्मेटमध्ये पुनरागमन करेल. वनडे वर्ल्डकप स्पर्धेत त्याची कामगिरी चांगली राहिली आहे. अंतिम सामन्यात धीम्या खेळीमुळे टीकेचा धनी ठरला असला तरी उर्वरित स्पर्धेत त्याने चांगली कामगिरी केली होती. पण त्यानंतर वनडे धुरा पुन्हा एकदा रोहित शर्माच्या खांद्यावर येईल. चॅम्पियन्स ट्रॉफीपर्यंत ही धुरा तो सांभाळणार असल्याचं निश्चित आहे.