मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत ग्लेन मॅक्सवेलने नाबाद 200 धावांची खेळी करत ऑस्ट्रेलियाला उपांत्य फेरीचा मार्ग मोकळा केला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा जेतेपदावर नाव कोरलं होतं. त्यामुळे ग्लेन मॅक्सवेल पुन्हा एकदा चर्चेत आला होता. त्यानंतर बिग बॅश लीगमध्ये त्याच्या नावाची चर्चा रंगली. बिग बॅश लीगमध्ये पराभवानंतर त्याने मेलबर्न स्टार्सचं कर्णधारपद सोडलं. तसेच 2 फेब्रुवारी ते 6 फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतून त्याला डावलण्यात आलं. एकापाठोपाठ एक मनाविरुद्ध घटना घडत असताना ग्लेन मॅक्सवेल पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. ग्लेन मॅक्सवेलला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली. पण क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे आणि चौकशी सुरु केली. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ग्लेन मॅक्सवेलने नेमकं असं काय केलं की क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्याची चौकशी सुरु केली आहे. चला जाणून घेऊयात नेमकं काय प्रकरण आहे ते
मॅक्सवेलने एका पार्टीत क्षमतेपेक्षा जास्त दारू रिचवली. त्यामुळे पार्टीत अस्वस्थ झाला आणि बेशुद्ध झाला. मित्रांनी त्याला उठवण्याचा प्रयत्न केला पण तो काही उठला नाही. त्यामुळे त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आहे. ऑस्ट्रेलियन मीडिया रिपोर्टनुसार, मॅक्सवेलला एडिलेडमध्ये रुग्णावाहिकेतून रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आता त्याची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं जात आहे. पण कोणाला काही कळू नये म्हणून त्याने रात्रीच रुग्णालयातून पळ काढला. आता या प्रकरणाला वादाचं स्वरुप प्राप्त झालं आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सांगितलं की, ‘क्रिकेट मंडळाने ग्लेन मॅक्सवेलबाबत माहिती मागवली आहे. वनडे टीममध्ये जागा न मिळण्याचा येथे तसा काहीच संबंध नाही. हा निर्णय बीबीएलनंतर व्यक्तिगत निर्णयाच्या आधारावर घेतला गेला आहे. मॅक्सवेल टी20 मालिकेतून पुनरागमन करेल इशी आशा आहे. पण या वेळेस त्यावर बोलणं योग्य ठरणार नाही.’
2017 मध्येही ग्लेन मॅक्सवेलने दारुच्या नशेत आपल्या जीव धोक्यात टाकला होता. मीडिया रिपोर्टनुसार, आयपीएल 2017 मध्ये किंग्स इलेव्हन पंजाब आणि गुजरात लायंस सामन्यावेळी हा प्रकार घडला होता. या सामन्यापूर्वी किंग्स इलेव्हन पंजाब व्यवस्थापनाला न विचारताच गुजरात लायन्सच्या प्रमोटर पार्टीत गेला होता. त्या पार्टीत शुद्ध हरपेपर्यंत दारू रिचवली होती. रस्त्यावर गाड्यांचा वर्दळीतून नशेतच सायकलने हॉटेलमध्ये आला होता.