मुंबई : वर्ल्ड कप 2023 झाल्यानंतर आता सर्वांना आयपीएलचे वेध लागले आहेत. टीम इंडियाला फायनलमध्ये हरवत कांगारूंच्या संघाने सहाव्यांदा वन डे वर्ल्ड कपवर नाव कोरलं. 130 कोटी भारतीयांच्या मनावर एक मोठी जखम कांगारूंनी केलीय. वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियासाठी गेमचेंझर ठरलेल्या ग्लेन मॅक्सवेल याने आयपीएलबाबत केलेल्या वक्तव्यची मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसत आहे. मॅक्सवेलने आपण कधीपर्यंत आयपीएल खेळणार असल्याचं जाहीर केलं आहे. यासंदर्भात वक्तव्य करताना मॅक्सवेलने टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहली आणि डिव्हिलीयर्सचं नाव घेतलं आहे.
मी माझ्या करिअरमध्ये आयपीएलने महत्त्वाची भूमिका निभावली आहे. कारण आयपीएलच्या निमित्ताने तुम्हाला अनेक महान खेळाडू आणि कोचसोबत खेळायला मिळतं. विराट कोहली, ए. बी. डिव्हीलियर्ससारखे खेळाडू तुमच्यासोबत खेळत असतील तर तुम्हाला आणखी काय हवं? त्यामुळे जोपर्यंत माझे पाय चालत राहतील तोपर्यंत मी आयपीएल खेळत राहणार असल्याचं ग्लेन मॅक्सवेलने म्हटलं आहे.
ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनीही आयपीएलमध्ये सहभागी व्हावं, त्यामुळे त्यांना खूप अनुभव मिळेल. भारतीय खेळपट्ट्यांवर खेळल्याने तुम्हाला वेस्ट इंडिजच्या खेळपट्ट्यांवर खेळणंं सोप्प जाईल, असंही मॅक्सवेल म्हणाला. यंदाच्या वर्ल्ड कपमधील मॅक्सवेलचं वादळी द्विशतक सर्वांच्याच लक्षात राहिलं आहे. त्यानंतर भारताविरूद्धच्या टी-20 मालिकेमध्येही शतकी खेळी करत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका त्याने बजावली होती.
दरम्यान, यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये ग्लेन मॅक्सवेल याने 9 सामन्यात 400 धावा केल्या होत्या, ज्यामध्ये एक द्विशतक आणि एक शतकही होते. मॅक्सवेलने साखळी फेरीतील अफगाणिस्ताविरूद्धचा सामना एकट्याच्या जीवावर काढला होता. टॉप ऑर्डर उद्ध्वस्त झाल्यानंतर सर्वांना वाटलेलं की अफगाणिस्तानचा संघ दुसरा उलटफेर करणार मात्र पठ्ठ्याने चौकार, षटकारांचा पाऊस पाडत संघाला विजय मिळवून दिला होता.