भारतीय क्रिकेट संघात खेळलेल्या हनुमा विहारीने आंध्र क्रिकेट संघावर गंभीर आरोप केले होते. इतकंच काय तर स्पर्धेदरम्यान कर्णधारपदही सोडलं होतं. तसेच आंध्र प्रदेशसाठी पुन्हा खेळणार नसल्याचं सांगितलं होतं. मध्य प्रदेशने आंध्र प्रदेशला 4 धावांनी पराभूत केल्यानंतर हनुमा विहारीने आपलं मत जाहीरपणे मांडलं होतं. यावेळी त्याने एका खेळाडूवर ओरडल्याने माझ्यावर कारवाई करण्यात आल्याचा आरोप केला होता. या खेळाडूवर राजकीय वरदहस्त असल्याचंही त्याने सांगितलं होतं. यासाठी कर्णधारपद सोडण्याचा दबाव होता आणि ते सोडावं लागलं असंह त्याने जाहीरपणे सांगितलं होतं. पण आता हनुमा विहारीने युटर्न घेतला असून पुन्हा एकदा आंध्र प्रदेशसाठी खेळणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. हनुमा विहारीने मंगळवारी सोशल मिडिया एक्सवर याबाबतची माहिती दिली आहे. इतकंच काय तर टीडीपी नेते नारा लोकेश यांच्यासोबतचा एक फोटोही शेअर केला आहे. हनुमा विहारीने कर्णधारपद सोडलं तेव्हा राज्यात वायएसआर काँग्रेसचं सरकार होतं. मात्र आता सरकार बदललं असून टीडीपीची सत्ता आली आहे.
“पाठिंबा दिल्याबद्दल धन्यवाद सर. मी आंध्र प्रदेशला पुढे घेऊन जाण्यास सज्ज आहे. मला खात्री आहे की, आंध्र क्रिकेटचं भविष्य सुरक्षित आहे.”, अशी पोस्ट हनुमा विहारीने सोशल मीडियावर लिहिली आहे. हनुमा विहारीने आंध्र क्रिकेटला रामराम ठोकून एनओसीही घेतली होती. इतकंच काय तर एनओसी देण्यास दिरंगाई केल्याचा आरोपही केला होता. हनुमा विहारीने मध्य प्रदेशकडून खेळण्याची तयारी केली होती. पण आता या बाबींवर पडदा पडला असून हनुमा विहारी आंध्र प्रदेशकडूनच खेळणार आहे.
Thank you so much for your support sir.
I’ll strive to take Andhra cricket forward.
I’m sure the future of Andhra cricket is in safe hands. https://t.co/9iQS7CdkhI— Hanuma vihari (@Hanumavihari) June 25, 2024
हनुमा विहारी भारतीय संघासाठी 16 कसोटी सामने खेळला आहे. यात त्याने 33.56 च्या सरासरीने 839 धावा केल्या आहेत. यात एक शतक आणि 5 अर्धशतकं ठोकली आहे. विहारीने आपला शेवटचा कसोटी सामना इंग्लंडविरुद्ध बर्मिंघममध्ये 2022 मध्ये खेळला होता. हनुमा विहारीची ऑस्ट्रेलियाविरुद्धची खेळी कायम स्मरणात राहणारी आहे. या कसोटीत विहारीने चांगली खेळी केली होती आणि गाबा टेस्ट जिंकून मालिका आपल्या नावावर केली होती.