रोहितला हटवून हार्दिक पंड्या याला मुंबई इंडियन्सचा कॅप्टन करण्यात आलं. मुंबई इंडियन्सची कॅप्टन्सी मिळाल्यानंतर हार्दिक पंड्या याच्या अडचणी वाढल्या हार्दिकच्या नेतृत्वात मुंबईचा आयपीएलच्या 17 व्या मोसमात सलग 3 सामन्यात पराभव झाला. त्यात रोहितला कर्णधारपदावरुन हटवल्याचा रागही हार्दिकला सहन करावा लागतोय. हार्दिकवर नेटकऱ्यांकडून आणि क्रिकेट चाहत्यांकडून जोरदार टीका करण्यात येत आहे. हार्दिक चौफेर टीका होत असताना शंकराला शरण गेला आहे.
हार्दिकने शुक्रवारी 5 एप्रिल रोजी गुजरातमधील प्रभास पाटन येथील सोमनाथ मंदिराचं दर्शन घेतलं. हार्दिकने सोमनाथ मंदिरात मनोभावे पूजा केली. हार्दिकने पूजा केल्याचा व्हीडिओ सोमनाथ मंदिर समितीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. हार्दिक आधी अनेक क्रिकेटपटू हे सोमनाथ मंदिरात शंकराच्या चरणी लीन झाले आहेत. यामध्ये विराट कोहली, सूर्यकुमार यादव आणि इतर क्रिकेटपटूंचा समावेश आहे.
मुंबई इंडियन्स टीम आयपीएलच्या 17 व्या हंगामादरम्यान जामनगरमध्ये पूर्वनियोजित दौऱ्यावर आहे. मुंबईचे खेळाडू विश्रांतीवर आहेत. मुंबईचा आगामी आणि चौथा सामना हा दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध आहे. मुंबई विरुद्ध दिल्ली 7 एप्रिल रोजी वानखेडे स्टेडियमवर भिडणार आहेत. त्याआधी हार्दिकने सोमनाथ मदिंरात भोलेनाथाचं दर्शन घेतलं.
Hardik Pandya offers prayers at Somnath Temple. 🙏pic.twitter.com/hZNIVQ3MH3
— Johns. (@CricCrazyJohns) April 5, 2024
हार्दिकने सोमनाथ मंदिरात शंकराच्या पूजेसाठी डोक्यावर ताट घेत प्रवेश केला. हार्दिक व्हायरल व्हीडिओत शिवलिंगावर दूधापासून बनवलेलं प्रसाद अर्पण करताना दिसतोय. तसेच हार्दिकने रुद्राक्ष माळ घातली आहे. हार्दिकचं हे अध्यातमिक रुप चाहत्यांना आवडलंय.
दरम्यान मुंबई इंडियन्सला गुजरात, हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्सकडून पराभूत व्हावं लागलं. मुंबई आता आपला पुढील सामना दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध खेळणार आहे. दिल्ली विरुद्धच्या सामन्यााधी मुंबईच्या ताफ्यात दुखापतीनंतर सूर्यकुमार यादव याची एन्ट्री झाली आहे. सूर्यकुमार यादव याच्या एन्ट्रीमुळे मुंबईची ताकद वाढली आहे. त्यामुळे चौथ्या सामन्यात मुंबईने विजयाचं खातं उघडावं अशी, चाहत्यांना आशा आहे.
मुंबई इंडियन्स टीम : हार्दिक पंड्या (कॅप्टन), रोहित शर्मा, टीम डेव्हिड, इशान किशन, विष्णू विनोद, नेहल वढेरा, सूर्यकुमार यादव, देवाल्ड ब्रेविस, पियुष चावला, श्रेयस गोपाल, अंशुल कंबोज, मोहम्मद नबी, शम्स मुलानी, रोमॅरियो शेफर्ड, तिलक वर्मा, जसप्रीत बुमराह, जेराल्ड कोएत्झी, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, अर्जुन तेंडुलकर, नुवान तुषारा, नमन धीर, शिवालिक शर्मा, ल्यूक वुड आणि क्वेना माफाका.