गौतम गंभीरचा प्रशिक्षकपदाच्या कार्यकाळाला श्रीलंका मालिकेपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेत टीम इंडिया तीन टी20 आणि तीन वनडे सामने खेळणार आहे. त्यानंतर कसोटी आणि वनडे मालिकांची साखळी सुरु होईल. गौतम गंभीरपुढे सध्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप हे लक्ष्य असणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर प्रशिक्षक गौतम गंभीर याने केलेलं वक्तव्य महत्त्वाचं आहे. गौतम गंभीरने नुकतीच स्टार स्पोर्ट्सला मुलाखत दिली. त्यावेळी त्याने सांगितलं की, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंनी तिन्ही फॉर्मेटमध्ये खेळलं पाहीजे. या माध्यमातून गौतम गंभीरने खेळाडूंना स्पष्ट संदेश दिला आहे की, फॉर्मेट निवडण्याची संधी देणार नाही. त्यामुळे हार्दिक पांड्याच्या अडचणीत वाढ झाली आहे. कारण हार्दिक पांड्या सध्या कसोटी क्रिकेटमध्ये खेळत नाही. तसेच त्याची आंतरराष्ट्रीय पातळीवर चांगली कामगिरी आहे. त्यामुळे कसोटीत निवड झाली तर खेळावंच लागेल, असं दिसत आहे.
“मला कोणत्याही खेळाडूला फक्त कसोटी, एकदिवसीय किंवा टी20 संघांसाठी ठेवायचे नाही. मी कोणत्याही खेळाडूचा वर्कलोड हाताळण्याच्या बाजूने नाही. व्यावसायिक क्रिकेटपटूची कारकीर्द खूपच लहान असते. जास्तीत जास्त सामने खेळावेत.”, असा स्पष्ट संदेश गौतम गंभीरने दिला आहे. “जर एखाद्या खेळाडूकडे तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळण्याची क्षमता असेल तर त्याला विशिष्ट फॉरमॅट निवडण्याची परवानगी नाही. या तिन्ही मॉडेल्समध्ये आपल्याला खेळावं लागणार.”, असंही गंभीरने पुढे सांगितलं.
हार्दिक पांड्या गेली अनेक वर्षे टी20 आणि वनडे सामने खेळत आहे. 2017 मध्ये हार्दिक पांड्याने कसोटी कारकिर्दिला सुरुवात केली होती आणि 2018 मध्ये शेवटचा सामना खेळला. त्यानंतर आतापर्यंत हार्दिक एकही कसोटी सामना खेळलेला नाही. हार्दिक पांड्या आतापर्यंत एकूण 11 कसोटी सामने खेळला आहे. त्यात त्याने 532 धावा केल्या आहेत. यात त्याने एक शतक आणि चार अर्धशतकं झळकावली आहेत. 108 ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. त्याचबरोबर गोलंदाजीत त्याने 17 विकेट्स घेतल्या आहेत. या उलट हार्दिक पांड्या 86 वनडे आणि 100 टी20 सामने खेळला आहे.