मुंबई इंडियन्सने वानखेडे स्टेडियमवर सूर्यकुमार यादव याच्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर सनरायजर्स हैदराबादचा 7 विकेट्सने पराभव केला. हैदराबादला या पराभवामुळे आता प्लेऑफमधील आव्हान कायम ठेवण्यासठी अडचणींचा सामना करावा लागू शकतो. हैदराबादला या पराभवामुळे आगामी 3 पैकी 2 सामन्यात कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवावाच लागणार आहे. मुंबईच्या या विजयानंतर कॅप्टन हार्दिक पंड्या याने म्हटलं की, आम्ही चांगल्या प्रकारे क्रिकेट खेळण्याकडे लक्ष देऊ इच्छितो. तरीही वाटतं की आम्ही 10 ते 15 धावा जास्त दिल्या. फलंदाजांनी ज्या प्रकारे बॅटिंग केली, ते अप्रतिम होतं.
“हार्दिकने आपल्या बॉलिंगबाबत आवर्जून उल्लेख केला. मला योग्य ठिकाणी बॉलिंग करणं आवडतं. मी परिस्थितीनुसार बॉलिंग करतो. मी आज अचूक बॉलिंग केली आणि त्याचा उपयोग झाला. आपल्याला अचूक रहावं लागतं. हल्ली गोलंदाजांकडून चुका कमी अपेक्षित आहेत”, असं हार्दिकने म्हटलं. हार्दिकच्या या वक्तव्यामुळे त्याने विजयाचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करतोय का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. हार्दिकने या सामन्यात 4 ओव्हर बॉलिंग केली. हार्दिकने या 4 ओव्हरमध्ये 7.80 च्या इकॉनॉमीने 31 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. हार्दिकने हैदराबादच्या नितीश रेड्डी, मार्को जान्सेन आणि शाहबाज अहमद या तिघांना बाद केलं.
सूर्यकुमार यादवची खेळी पाहिल्यानंतर हार्दिक म्हणाला की हे अविश्वसनीय आहे. सूर्यकुमार गोलंदाजांना दबावात ठेवतो हा त्याचा भूतकाळ आहे. हा आत्मविश्वास आहे. सूर्याचा खेळ बदलला आहे. तो सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. सूर्यकुमार खेळ वेगळ्या पद्धतीने बदलू शकतो. सूर्यकुमार आमच्या टीममध्ये आहे, हे आमचं भाग्य आहे, असं हार्दिकने म्हटलं.
सनरायझर्स हैदराबाद प्लेइंग ईलेव्हन : पॅट कमिन्स (कॅप्टन), अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, मयंक अग्रवाल, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, शाहबाज अहमद, मार्को जान्सेन, भुवनेश्वर कुमार आणि टी नटराजन.
मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : हार्दिक पांड्या (कॅप्टन), इशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा, नमन धीर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टिम डेव्हिड, अंशुल कंबोज, पीयूष चावला, जसप्रीत बुमराह आणि नुवान तुषारा.