हार्दिक पांड्या हा मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमधील एक दिग्गज क्रिकेटपटू आहे. कोणत्याही क्षणी बॅट किंवा चेंडूने सामना फिरवण्याची ताकद आहे. त्यामुळेच टी20 क्रिकेट फॉर्मेटमध्ये त्याचा वरचष्मा पाहायला मिळाला आहे. असं असताना मागच्या काही दिवसात त्याचं टी20 क्रमवारीतील अव्वल स्थान डळमळीत झालं होतं. इंग्लंडच्या लियाम लिव्हिंगस्टोनने त्याला मागे टाकून हे स्थान काबीज केलं होतं. त्यामुळे आता या स्थानावर हार्दिक पांड्या काही लवकर पोहोचत नाही असंच वाटत होत. पण हार्दिक पांड्याने पुन्हा अव्वल स्थान पटकावून दाखवलं आहे. संपूर्ण वर्षभरात आणि खासकरून दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत केलेल्या चमकदार कामगिरीमुळे हे शक्य झालं आहे. हार्दिक पांड्याला टी20 क्रमवारीत अव्वल स्थान मिळाल्याने त्याला नक्कीच बळ मिळणार आहे. आयपीएल 2025 स्पर्धेत त्याला रिटेन केल्याने मुंबई इंडियन्स फ्रेंचायझीलाही योग्य निर्णय घेतल्याचं वाटलं असेल.
हार्दिक पांड्याने 2024 या वर्षात टी20 फॉर्मेटमध्ये 352 धावा केल्या आहेत. त्यासोबत 16 विकेटही घेतल्या आहेत. दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतील शेवटच्या सामन्यात जबरदस्त गोलंदाजी केली. त्याने तीन षटकात एक निर्धाव षटक टाकलं.तसेच फक्त 8 धाव देत एक गडीही बाद केला. 244 रेटिंग प्वॉइंटसह हार्दिक पांड्या टी20 क्रमवारीत पहिल्या स्थानावर आहे. यापूर्वी इंग्लंडचा लियाम लिव्हिंगस्टोन पहिल्या स्थानावर होता.मात्र आता त्याची तिसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे.
टी20 फॉर्मेटमध्ये अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत हार्दिक पांड्या पहिल्या, नेपाळचा दीपेंद्र सिंग ऐरी दुसऱ्या, इंग्लंडचा लियाम लिव्हिंगस्टोन तिसऱ्या, ऑस्ट्रेलियाचा मार्कस स्टॉयनिस चौथ्या, श्रीलंकेचा माजी कर्णधार वानिंदू हसरंगा पाचव्या, अफगाणिस्तानचा मोहम्मद नबी सहाव्या, झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझा सातव्या, वेस्ट इंडिजचा रोमॅरियो शेफर्ड आठव्या, दक्षिण अफ्रिकेचा एडन मार्करम नवव्या आणि दहाव्या क्रमांकावर गेरहार्ड इरास्मम आहे.