मुंबई : वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये आता मोठा ट्विस्ट आला आहे. अफगाणिस्तान संघाने नेदरलंँड संघाचा पराभव करत सेमी फायनलसाठी आपली जागा आणथी मजबूत केली आहे. आजच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या नेदरलँड संघाला अवघ्या 179 धावांवर गुंडाळलं, नेदरलंडकडून सायब्रँड एंजेलब्रेक्ट याने 58 धावांची अर्धशतकी खेळी केली. अफगाणिस्तान संघाकडून मोहम्मद नबी याने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना कर्णधार हशमतुल्ला शाहिदी याने नाबाद 56 आणि रहमत शाह 52 धावा यांच्या अर्धशतकाच्या जोरावर संघाने विजय साकारला. सामना संपल्यानंतर बोलताना हशमतुल्ला शाहिदी याने सेमी फायनलबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
आज गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्ही एकदम व्यवस्थित झालं, आमचा संघ तिसऱ्यांदा लक्ष्याचा पाठलाग करण्यात यशस्वी झाला. मोहम्मद नबी हा आमचा खास खेळाडू आहे कारण संघाला जशी गरज आहे तशाप्रकारे तो खेळतो. या विजयानंतर आम्ही सर्व खेळाडू आनंदी असून सेमी फायनल गाठणं आमचं लक्ष्य असणार आहे. सेमी फायनलमध्ये प्रवेश केला तर आमच्यासाठी मोठं यश असणार आहे. तीन महिन्यांआधी मी माझ्या आईला गमावलं आहे, आमच्या देशात बरेच लोक आता बेघर असून जगण्यासाठी संघर्ष करत आहेत त्यांचे व्हिडीओ आम्ही पाहतो. हा विजय त्यांना समर्पित असल्याचं हशमतुल्ला शाहिदी याने म्हटलं आहे.
आजच्या विजयानंतर अफगाणिस्तान संघाने पाचव्या स्थानी झेप घेतली आहे. आता मजा अशी आहे की न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानचे गुण सारखे झाले आहेत. तिन्ही संघाचे गुण आठ झाले असल्याने अफगाणिस्तानने सर्व सामने जिंकले आणि न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया या दोन संघांमध्ये कोणता संघ कमी पडला तर अफगाणिस्तान नक्की सेमी फायनल गाठण्यात यशस्वी ठरू शकतो.
अफगाणिस्तान प्लेईंग ईलेव्हन | हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज, इब्राहिम झद्रान, रहमत शाह, अजमतुल्ला ओमरझाई, इक्रम अलीखिल (विकेटकीपर), मोहम्मद नबी, रशीद खान, मुजीब उर रहमान, फजलहक फारुकी आणि नूर अहमद.
नेदरलँड्स प्लेईंग ईलेव्हन | स्कॉट एडवर्ड्स (कॅप्टन आणि विकेटकीपर), वेस्ली बॅरेसी, मॅक्स ओडॉड, कॉलिन अकरमन, सायब्रँड एंजेलब्रेक्ट, बास डी लीडे, साकिब झुल्फिकार, लोगन व्हॅन बीक, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, आर्यन दत्त आणि पॉल व्हॅन मीकरेन.