मुंबई | पावसामुळे अनेक क्रिकेट सामने रद्द होतात. तर काही वेळा सामन्यांमधील षटकं कमी केली जातात. यामुळे उत्साहाने स्टेडियममध्ये सामना पाहायला आलेल्या क्रिकेट चाहत्यांचा हिरमोड होता. दोन्ही संघांना प्रत्येकी 1 पॉइंट वाटून दिल्याने पॉइंट्सटेबलचं गणितही बिघडतं. पावसामुळे सर्व समीकरणं बदलतात. मात्र आता असं काहीच होणार नाहीये. गेल्या अनेक वर्षात तंत्रज्ञान विकसित झालंय. या तंत्रज्ञानाच्या विकासामुळे आता सामना रद्द होणार नाही. यामुळे कितीही पाऊस पडला तरी नो टेन्शन.ही पद्धत नक्की काय आहे, आणि पावसानंतरही सामना कसा खेळवण्यात येणार, हे आपण जाणून घेऊयात.
आता धोधो, मुसळधार किंवा बदाबदा, पाऊस कसाही पडो, अवघ्या 20 मिनिटात आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने पावसाच्या पाण्यावर पाणी फेरलं जाणार आहे, म्हणजेच खेळपट्टीवरील जमलेलं पाणी नाहीसं होणार. पाऊस पडल्याने आऊटफिल्डवर परिणाम होतो. मात्र तंत्रज्ञानाच्या मदतीने 20 मिनिटात मैदान आधीसारखं खेळण्याच्या लाईकीच होईल. हे शक्य होणार आहे ते एडवान्स सब एअर सिस्टमुळे.
एडवान्स सब एअर सिस्टमुळे पावसानंतर मैदान लवकरात लवकर सुकवण्यात मदत होईल, ज्यामुळे खेळावर परिणाम होणार नाही. याआधी स्टेडियमच्या एका भागात पाणी काढण्यासाठी ड्रेनेज सिस्टमचा वापर करण्यात आला होता. सामने रद्द झाल्याने भविष्यात पुन्हा तसं होऊ नये, यासाठी एडवान्स सब एअर सिस्टमचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एचपीसीए अर्थात हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनने हा निर्णय घेतला आहे. धर्मशाळा स्टेडियममध्ये 2 सामने रद्द झालेत. त्यामुळे तडकाफडकी हा निर्णय घेतला गेला. याचं सर्व काम मार्च महिन्यातच पूर्ण झालं.
“धर्मशाळा स्टेडियममधील नव्या आऊटफिल्डमधील पावसाचं पाणी काढण्यासाठी एडवान्स सब एअर ड्रेनेज सिस्टम स्थापित करण्यात आलं आहे. ज्यामुळे पावसाचं पाणी 20 मिनिटात सुकवलं जाईल. त्यानंतर मैदानात खेळता येईल”, असं एचपीसीएचे सचिव अवनीश परमार यांनी सांगितलं.
सब एअर सिस्टमच्या मदतीने मैदान लवकरात लवकर सुकवलं जातं. या सिस्टमच्या मदतीने संपूर्ण मैदानात आऊट फिल्डमध्ये परफारेटड पाईप टाकले जातात. यामध्ये बारीक बारीक छिद्र असतात. या छिद्रांच्या मदतीने पाणी या पाईपच्या माध्यमातून बाहेर पडतं. तसेच प्रेशरमुळे पाणी शोषून बाहेर काढलं जातं. इतकंच नाही, तर या सिस्टमच्या मदतीने मैदानातील गवताच्या मुळात जाऊन पाणी एअर प्रेशरच्या मदतीने शोषून काढलं जाऊ शकतं.