मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला 14 नोव्हेंबर 2012 साली अखेरचा रामराम केला. सचिनने जिथे क्रिकेटची सुरुवात केली, त्या वानखेडे स्टेडियममध्येच विंडिज विरुद्ध अखेरचा कसोटी सामना खेळला. सचिनला क्रिकेट चाहत्यांनी कसोटी सामन्यांच्या ‘द्विशतकासह अविस्मरणीय निरोप दिला. सचिनने टेस्ट क्रिकेटमधील 200 सामन्यांमध्ये 329 डावात 6 द्विशतकं, 51 शतकं आणि 68 अर्धशतकांसह 15 हजार 921 धावा केल्या. तसेच सचिनने 463 एकदिवसीय सामन्यांत 1 द्विशतक, 49 शतकं आणि 96 अर्धशतकं झळकावली. सचिनला फक्त एकच टी 20i सामना खेळण्याची संधी मिळाली. त्यामुळे सचिनला सर्वात छोट्या क्रिकेट प्रकारात फार काही करता आलं नाही.
सचिनच्या निवृत्तीला आता जवळपास 12 वर्ष होत आली आहेत. सचिनच्या नावावर असलेले विश्व विक्रम अजूनही कायम असले तरी, काही विक्रम हे मोडीत निघण्याच्या ‘रुट’वर (मार्गावर) आहेत. सचिनच्या नावावर सर्वाधिक कसोटी आणि एकदिवसीय धावांचा विक्रम आहे. इतकंच नाही, तर सर्वाधिक 100 आंतरराष्ट्रीय शतकांचा विक्रमही सचिनच्या नावेच आहेत. मात्र रेकॉर्ड होतातच ब्रेक होण्यासाठी हे विराट कोहली याने सिद्ध करुन दाखवलं. विराटने 15 नोव्हेंबर 2023 साली वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत दक्षिण आफ्रिके विरुद्ध शतक ठोकलं. विराटने या शतकासह सचिनच्या सर्वाधिक 49 शतकांचा रेकॉर्ड उध्वस्त केला. त्यानंतर आता सचिनचे काही विक्रम हे इंग्लंडच्या जो रुटमळे मोडीत निघण्याची शक्यता बोलून दाखवली जात आहे.
सचिनच्या सर्वाधिक कसोटी धावांचा विक्रम धोक्यात आहे. इतकंच नाही, तर जो रुट हा ‘फॅब फोर’मध्येही अव्वल ठरलाय. जो रुटने गेल्या काही वर्षात कसोटी क्रिकेटमध्ये केलेली कामगिरी पाहता तो सर्वाधिक धावांच्या विश्व विक्रमापासून फार दूर नाही, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
तेव्हाचं-आताचं क्रिकेट, तंत्रज्ञान, सुरक्षिततेची साधनं, परिस्थिती आणि इतर सर्व बाबी लक्षात घेता सचिन आणि विराट-रुट यांच्या वेळेस असलेली स्थिती भिन्न असल्याचं स्पष्ट होतं. त्यामुळे वरील सर्व बाबींचा विचार करता सचिनच्या आणि इतरांच्या धावांची तुलना करणं हे चुकीचंच ठरेल. मात्र आकड्यांबाबत सचिनचे काही वर्ल्ड रेकॉर्ड धोक्यात आहेत, हे ही तितकंच खरं आहे.
जो रुटने लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडमध्ये श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवशी (29 ऑगस्ट) 84 चेंडूत अर्धशतक तर 162 बॉलमध्ये शतक पूर्ण केलं. जो रुटने या खेळीसह काही विक्रम केले. रुटची कसोटी क्रिकेटमध्ये 50+ अधिक धावा करण्याची ही 97 वी वेळ ठरली. रुटने यासह विंडिजचा माजी दिग्गज शिवनारायण चंद्रपॉल याचा 96 वेळा 50+ अधिक धावांचा विक्रम मोडीत काढला. तसेच रुटने कसोटी कारकीर्दीत श्रीलंकेविरुद्ध झळकावलेलं हे 33 वं शतक ठरलं. रुट यासह इंग्लंडसाठी संयुक्तरित्या सर्वाधिक शतकं करणारा एलिस्टर कूकनंतर पहिला फलंदाज ठरला.
जो रुटने त्याच्या कसोटी कारकीर्दीत 144 सामन्यांमध्ये (श्रीलंके विरूद्धच्या पहिल्या कसोटीपर्यंत) 50.33 च्या सरासरीने 12 हजार 131 धावा केल्या आहेत. जो रुट सचिनच्या तुलनेत 144 सामन्यानंतर पुढे आहे. सचिनने 144 सामन्यांनंतर 11 हजार 532 धावा केल्या. सचिनने 200 सामन्यांच्या कारकीर्दीत 15 हजार 921 धावा केल्या.
रुट 200 सामने खेळला आणि सद्याच्या सरासरीने प्रत्येक डावात 50 धावाही केल्या, तरीही तो 75 डावात अर्थात 38 सामन्यांमध्ये सचिनचा वर्ल्ड रेकॉर्ड उद्धवस्त करेल. रुट अशाप्रकारे 182 व्या सामन्यातच सर्वाधिक धावांचा वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर करेल. तसेच रुटला सचिनच्या सर्वाधिक 68 कसोटी अर्धशतकांचा विक्रम मोडीत काढण्यासाठी 4 फिफ्टीची गरज आहे.
रुटला सचिनचा सर्वाधिक 200 कसोटी सामन्यांचा रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी आहे. रुट सध्या 33 वर्षांचा आहे. तर सचिनचं वय 144 व्या कसोटी वेळेस 35 वर्ष इतकं होतं. आता रुट इथून सचिनप्रमाणे वयाच्या 39 वर्षांपर्यंत दरवर्षी 10 सामने सामने खेळला, तर तो आणखी 60 सामने खेळू शकतो. इंग्लंड दरवर्षी इतरांच्या तुलनेत सर्वाधिक सामने खेळते. इंग्लंड दशकभरात दरवर्षी सरासरी 11 कसोटी सामने खेळतेय.
रुटला भले सचिनच्या सर्वाधिक धावांचा विक्रम मोडण्याची संधी असली, तरी त्याच्यासाठी मास्टर ब्लास्टरचा सर्वाधिक कसोटी शतकांचा (51) रेकॉर्ड ब्रेक करणं अवघड ठरु शकतं. रुटच्या नावे सध्या 32 शतकं आहेत. रुट दर 4.5 सामन्यांनंतर शतक ठोकतोय. रुटला याच वेगाने सचिनला मागे टाकण्यासाठी आणखी 90 सामने खेळावे लागतील, जे वयोमानानुसार अशक्य जरी नसलं तरी सोप्पं नाही, इतकं मात्र निश्चित.
सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या 4 फलंदाजांना फॅब 4 म्हटलं जातं. विराट कोहली, केन विलियमसन, स्टीव्हन स्मिथ आणि जो रुट या 4 देशांच्या 4 दिग्गज खेळाडूंचा 2010 च्या दशकात फॅब 4 मध्ये समावेश झाला. रुट इथेही या तिघांना मागे टाकून पुढे निघालाय. एकट्या रुटच्या 12 हजार 131 धावा आहेत. तर उर्वरित तिघांपैकी एकालाही कसोटीत धावांच्या बाबतीत 10 हजार पार मजल मारता आलेली नाही.
रुटच्या नावे फॅब 4 मध्ये सर्वाधिक कसोटी शतकांचा विक्रम आहे. रुटने 144 सामन्यात 33 शतकं ( 33 वं शतक श्रीलंके विरूद्धच्या दुसऱ्या कसोटीतील) केली आहेत. केन विलियमसन याने 100 सामन्यात 32 शतकं झळकावली आहेत. स्टीव्हन स्मिथला 109 सामन्यांमध्ये 32 शतकांपर्यंत पोहचता आलं आहे. तर चौथ्या आणि सर्वात शेवटच्या स्थानी विराट आहे. विराटने 113 सामन्यात 29 शतकं केली आहेत.
तसेच रुट सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतकं करणाऱ्या सक्रीय फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. विराट कोहली या यादीत 80 शतकांसह अव्वल स्थानी आहे. रुट 49 आंतरराष्ट्रीय शतकांसह दुसऱ्या स्थानी आहे. रोहित शर्मा याचा 48 शतकांसह तिसरा नंबर लागतो. केन विलियमसनच्या नावे 45 तर स्टीव्हन स्मिथच्या खात्यात 44 शतकांची नोंद आहे.
रुटने 2021 पासून सातत्याने शतकं ठोकली आहेत. रुटने 2021 मध्ये 6, 2022 साली 5, 2023 मध्ये 2 तर 2024 या वर्षात त्याने आतापर्यंत 3 शतंक केली आहेत. तसेच रुटच्या नावावर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप साखळीत सर्वाधिक शतकांचा विक्रम आहे.