मुंबई :आयपीएल 2024 चा लिलाव नुकताच पार पडला असून या लिलावामध्ये ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी मजबूत पैसा जिंकला. कारण यंदाच्या लिलावामध्ये इतिहासातील सर्वात दोन मोठ्या बोली लागल्या. दोन्ही खेळाडू हे ऑस्ट्रेलियाचेच होते. ऑस्ट्रेलिया संघाचा पॅट कमिन्स आणि मिचेल स्टार्क हे इतिहासातील सर्वात महागडे खेळाडू ठरले आहेत. अशातच याचाच धागा पकडत स्टार माजी खेळाडू आकाश चोप्रा खेळाडू विराट कोहली जर लिलावात उतरला तर त्याला किती रूपयांची बोली लागू शकते जाणून घ्या.
आयपीएल लिलावामध्ये अनेक भारतीय खेळाडू असे आहेत जे लिलावामध्ये उतरले तर त्यांना सर्वात मोठी बोली लागू शकते. आकाश चोप्राच्या मते, विराट कोहली जर आयपीएल लिलावामध्ये उतरला तर त्याला मिचेल स्टार्कपेक्षा दुप्पट किंमत मिळू शकते. विराटला जवळपास 42- 45 कोटी रूपयांची बोली लागू शकते, असं आकाश चोप्राने म्हटलं आहे.
विराट कोहलीने आतापर्यंत 237 आयपीएल सामने खेळले आहेत. 229 डावांमध्ये विराटने 37.25 च्या सरासरीने 7263 धावा केल्या आहेत. यामध्ये विराट कोहली याने सात शतके आणि 50 अर्धशतके केली आहेत. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये विराट स्थानी आहे. या यादीमध्ये शिखर धवन दुसऱ्या स्थानावर असून त्याने 6617 धावा केल्या आहेत.
आयपीएल लिलावामध्ये ऑस्ट्रेलियाचा घातक गोलंदाज असलेल्या मिचेल स्टार्क याला 24 कोटी 70 लाख रूपयांची सर्वाधिक बोली लागली आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघाने त्याला खरेदी केलं आहे. त्यानंतर दुसरा खेळाडू पॅट कमिन्स याला 20 कोटी 50 लाख रूपयांची बोली लागली आहे. सनराईजर्स हैदराबाद संघाने त्याला आपल्या ताफ्यात घेतलं आहे. ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज स्पेन्सर जॉन्सनला 10 कोटी रुपयांना गुजरात टायटन्सने खरेदी केली आहे.