NZ vs SL : न्यूझीलंड संघ उपांत्य फेरी कसा गाठेल? नेट रनरेटपेक्षा या गोष्टीचं सर्वाधिक टेन्शन

| Updated on: Nov 08, 2023 | 3:41 PM

वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील साखळी फेरीचा शेवटचा टप्पा सुरु आहे. भारत, दक्षिण अफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाने उपांत्य फेरी गाठली आहे. पण एका स्थानासाठी न्यूझीलंड, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये चुरस आहे. पण सर्वाधिक संधी असलेल्या न्यूझीलंडचं टेन्शन वाढलं आहे.

NZ vs SL : न्यूझीलंड संघ उपांत्य फेरी कसा गाठेल? नेट रनरेटपेक्षा या गोष्टीचं सर्वाधिक टेन्शन
NZ vs SL : न्यूझीलंडला उपांत्य फेरी गाठण्यात मोठा अडसर! मॅच जिंकण्याचं टेन्शन नाही पण...
Image Credit source: Twitter
Follow us on

मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत सुरुवातीला चांगली कामगिरी करणाऱ्या न्यूझीलंडची गाडी रुळावरून घसरली. सलग चार सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागल्याने उपांत्य फेरीचं गणित जर तर वर आलं आहे. न्यूझीलंडचा साखळी फेरीतील शेवटचा सामना श्रीलंकेशी होणार आहे. हा सामना जिंकला तर न्यूझीलंडचा संघ उपांत्य फेरी गाठेल. कारण पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या तुलनेत नेट रनरेट चांगला आहे. त्यामुळे विजय मिळवला की उपांत्य फेरीत धडक अशी स्थिती आहे. पण असं असताना न्यूझीलंड संघाची धाकधूक वाढली आहे. न्यूझीलंड आणि श्रीलंका सामना बंगळुरुत होणार आहे. पण या सामन्यावर पावसाचं सावट आहे. या सामन्यात पावसाचा व्यत्यय आला तर काय खरं नही. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात पावसामुळे न्यूझीलंडला पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. त्यामुळे न्यूझीलंडला नशिबाची साथ हवी आहे.

न्यूझीलंडने मागच्या सामन्यात पाकिस्तानसमोर 402 धावांचं आव्हान दिलं होतं. पण पावसामुळे हा सामना पूर्ण होऊ शकला नाही. पाकिस्तानने 25.3 षटकात 1 गडी गमवून 200 धावा केल्या होत्या. त्यामुळे डकवर्थ लुईस नियमानुसार पाकिस्तानला 21 धावांनी विजयी घोषित करण्यात आलं. साखळी फेरीतील सामन्याला राखीव दिवस नाही. त्यामुळे पावसामुळे सामना झालाच नाही तर प्रत्येकी एक गुण मिळेल. अन्यथा डकवर्थ लुईस नियमानुसार नशिबाचा डाव लागेल.

न्यूझीलंडने श्रीलंके विरुद्धचा सामना जिंकला तर उपांत्य फेरीतील स्थान निश्चित होईल. कारण न्यूझीलंडचा नेट रनरेटे +0.398 इतका आहे. त्यामुळे पाकिस्तान आणि अफगाणिस्तानने विजय मिळवला तरी न्यूझीलंडला उपांत्य फेरीचं तिकीट मिळेल. उपांत्य फेरीत भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना असेल. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये होईल. 2019 वनडे वर्ल्डकपमध्ये न्यूझीलंडने भारताच्या स्वप्नांवर पाणी फेरलं होतं. पावसामुळे सामना दुसऱ्या दिवसावर गेला आणि भारतीय संघाची दाणादाण उडाली होती.

श्रीलंकेने न्यूझीलंडला पराभूत केलं तर पाकिस्तानला संधी मिळेल. पण पाकिस्तानला इंग्लंड विरुद्धचा सामना जिंकावा लागेल. त्यामुळे जर तरच सर्व गणित न्यूझीलंड आणि श्रीलंका सामन्यावर असणार आहे.