मुंबई | आयपीएलच्या आगामी 17 व्या मोसमासाठीचा लिलाव हा 19 डिसेंबर रोजी पार पडणार आहे. या ऑक्शनचं आयोजन हे दुबईत करण्यात आलं आहे. या लिलावासाठी एकूण 333 खेळाडूंची नावं निश्चित करण्यात आली आहेत. या 333 पैकी 77 खेळाडूंचीच निवड करण्यात येणार आहे. या लिलावाची लगबग सुरु असताना केकेआर अर्थात कोलकाता नाईट रायडर्सने खांदेपालट केली आहे. केकेआर टीम मॅनेजमेंटने टीमचा कॅप्टन बदलला आहे. तर जो कॅप्टन होता त्याला उपकर्णधारपदाची जबाबदारी दिली आहे.
श्रेयस अय्यर याला पुन्हा एकदा कोलकाता नाईट रायडर्सचा कॅप्टन करण्यात आला आहे. तर नितीश राणा याला उपकर्णधार केलं गेलं आहे. श्रेयस अय्यरला दुखापतीमुळे 16 व्या मोसमात खेळता आलं नाही. त्यामुळे नितीशला कॅप्टन करण्यात आलं. मात्र आता श्रेयस पूर्णपणे फिट असल्याने त्याला नेतृत्व देण्यात आलं आहे. तर नितीश राणा याला कर्णधारपदावरुन हटवून उपकर्णधार करण्यात आलं आहे.
आता श्रेयसला कॅप्टन्सी मिळाल्यानंतर त्याने नितीशला उपकर्णधार केल्याने प्रतिक्रिया दिली आहे. श्रेयसने दिलेली प्रतिक्रिया जाणून क्रिकेट चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. श्रेयसच्या वक्तव्यानंतर त्याची भाषा बदलली असं म्हटलं जात आहे. श्रेयस अय्यर नितीश राणा याच्याबाबत नक्की असं काय म्हणाला हे आपण जाणून घेऊयात.
“माझा विश्वास आहे की गेल्या मोसमात दुखापतीमुळे माझ्या अनुपस्थितीसह अनेक आव्हाने आमच्यासमोर होती. नितीशने केवळ माझ्यासाठीच नव्हे तर त्याच्या प्रशंसनीय नेतृत्वानेही उत्तम कामगिरी केली. केकेआरने त्याला उपकर्णधार म्हणून नियुक्त केले याचा मला आनंद आहे”, असं श्रेयस म्हणाला.
श्रेयस अय्यर आणि नितीश राणा या दोघांना कर्णधार आणि उपकर्णधार करण्यात आल्यानंतर टीमचा मेन्टॉर गौतम गंभीर याने ट्विट केलं आहे. गंभीरने श्रेयस आणि नितीशचं अभिनंदन केलं आहे. तसेच लढाईसाठी सज्ज रहा, असंही गंभीरने म्हटलंय. गंभीरचं ट्विट केकेआरने रिट्वीट केलंय.
दरम्यान केकेआरने 17 व्या मोसमासाठी एकूण 13 खेळाडूंना संघात कायम ठेवलं आहे. यामध्ये आंद्रे रसेल, अनुकूल रॉय, हर्षित राणा, जेसन रॉय, नितीश राणा, रहमानुल्लाह गुरबाज, रिंकू सिंह, श्रेयस अय्यर, सुनील नरेन, सुयश शर्मा, वैभव अरोडा, वरुण चक्रवर्ती आणि मिस्ट्री स्पिनर वेंकटेश अय्यर याचा समावेश आहे.