आयपीएल 2024 स्पर्धेपूर्वी भारतीय संघाचा विकेटकीपर बॅट्समन इशान किशन याच्याबाबत बऱ्यात बातम्या समोर आल्या होत्या. दक्षिण अफ्रिका दौरा मध्यात सोडून आल्यापासून ते आयपीएल खेळेपर्यंत बरंच काही घडलं. बीसीसीआयने वारंवार देशांतर्गत क्रिकेट खेळण्यासाठी इशारा दिला. मात्र इशानने त्याला केराची टोपली दाखवल्याचं पाहिलं गेलं. त्यानंतर इशान किशन थेट आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसला. सुरुवातीच्या काही सामन्यात इशान किशनला लय सापडली नाही. मात्र मागच्या दोन सामन्यात इशान किशनने साजेशी कामगिरी केली. इतकंच काय तर रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्धच्या सामन्यात 34 चेंडूत 69 धावांची खेळी केली. आयपीएलमधील 5 सामन्यात इशान किशनने 161 धावा केल्या आहेत. तसेच स्ट्राईक रेट हा 182.95 चा आहे. पत्रकार परिषदेत त्याला टी20 वर्ल्डकपबाबत विचारलं गेलं. यावर इशान किशनने आपल्या शैलीत उत्तर दिलं.
“विश्वचषकाबद्दल सांगायचं तर ते काही माझ्या हातात नाही. मी सध्या काही गोष्टी शांतपणे सोडवत आहे. एकावेळी मी एका सामन्याचा विचार करत आहे. खेळाडूंच्या हातात तसं काही नसतं ही बाब समजून घेणं आवश्यक आहे.”, असं इशान किशन सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत म्हणाला. “ही खूप मोठी स्पर्धा आहे आणि त्यात अतिउत्साही होण्याची गरज नाही. मी फक्त एकावेळी एका सामन्याचा विचार करतो. संघासाठी जे काही महत्त्वाचं आहे ते करण्याचा माझा प्रयत्न असतो.”, असंही तो पुढे म्हणाला.
इशान किशनने सध्याची कामगिरी कोणाला काही दाखवून देण्यासाठी नाही, असंही त्याने स्पष्ट केलं. “कोणाली काहीही दाखवून देण्याचा माझा हेतू नाही. मी फक्त खेळाचा आनंद घेत आहे.” काही गोष्टींवर नियंत्रण ठेवत असल्याचंही त्याने यावेळी स्पष्ट केलं. “आपण भुतकाळातून बऱ्याच गोष्टी शिकतो. जर मी तसाच असतो तर पहिल्या दोन षटकातील चेंडू सोडले नसते. पण मला आता 20 षटकंही मोठी असतात याची जाणीव आहे. खेळपट्टीवर वेळ काढून पुढे जात राहणं महत्त्वाचं आहे .” टी20 वर्ल्डकपसाठीच्या संघाची घोषणा 30 एप्रिल किंवा 1 मे रोजी होणार आहे. त्यामुळे कोणत्या 15 खेळाडूंची यासाठी निवड होते हे पाहणं औत्सुक्याचं आहे.