आयपीएल 2024 स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने एक चमत्कार घडवून दाखवला. साखळी फेरीत सलग सहा सामने जिंकले. तसेच प्लेऑफसाठी नेट रनरेटचं गणितही सोडवलं. इतका काट्याकुट्यातून प्रवास करत आरसीबीने एलिमिनेटर फेरीत स्थान मिळवलं होतं. पण राजस्थान रॉयल्सने आरसीबीचा 4 गडी राखून पराभव केला आणि पुढचा प्रवास थांबला. या पराभवानंतर आरसीबीचे खेळाडू आणि चाहते खूपच निराश होते. गेल्या 17 वर्षांपासूनची जेतेपदाची भूक यंदाही मिटली नाही. त्यामुळे खंत कायम राहिली. मात्र पराभवानंतरही हे पर्व कायम लक्षात राहील असं सांगण्यास विराट कोहली विसरला नाही. कारण या पर्वात आरसीबीची सुरुवात पराभवाने झाली होती. सलग पराभवामुळे साखळी फेरीतच आव्हान संपुष्टात येईल असं वाटत होतं. मात्र आरसीबीने सर्व अंदाज फेल ठरवले आणि प्लेऑफमध्ये स्थान मिळवलं. हा प्रवास वाटतो तितका सोपा नव्हता. सलग सहा सामन्यात करो या मरोची लढाई जिंकत हे स्थान गाठलं होतं. त्यामुळे ही स्पर्धा आरसीबीसाठी खऱ्या अर्थाने खास होती.
आरसीबीच्या पराभवानंतर विराट कोहलीने ड्रेसिंग रुममध्ये संवाद साधताना सांगितलं की, “आपण स्वत:ला मैदानात सिद्ध करण्यास सुरुवात केली. सन्मानासाठी खेळण्यास सुरुवात केली आणि आपल्याला आत्मविश्वास मिळाला. ज्या पद्धतीने सर्व गोष्टी बदलल्या आणि संघाने प्लेऑफमध्ये स्थान मिळवलं ते खरंच खूप खास होतं. ही एक अशी बाब आहे जी विराट कोहली कायम लक्षात ठेवेल. आम्हाला गोष्टीचा अभिमान आहे. शेवटी टीम तसं हवं तशीच खेळणं गरजेचं होती.”
आरसीबीचा कर्णधार फाफ डु प्लेसिसने सांगितलं की, “इतक्या जबरदस्त पुनरागमनानंतर बऱ्याच आशा वाढल्या होत्या. जेव्हा तुम्ही काही खास करता तेव्हा तुमच्या अपेक्षा आणखी वाढतात. त्याच्याकडे आस लावून असतात.” दुसरीकडे, आरसीबीचे प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांनी सामन्यातील पराभवानंतर खरं काय ते मत मांडलं. “आरसीबीची गोलंदाजी कमकुवत होती. येणाऱ्या काळात आरसीबीला चिन्नास्वामीसारख्या मैदानात चांगल्या गोलंदाजीसाठी खास गोलंदाजीची गरज आहे.”, अशी जाहीर कबुली त्यांनी दिली. आता येणाऱ्या पर्वात आरसीबी गोलंदाजांसाठी कसा डाव रचते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.