मुंबई | आयसीसी अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने आगामी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. आयसीसीने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे. स्पर्धेंचं यजमानपद हे संयुक्तरित्या अमेरिका आणि वेस्ट इंडिजकडे आहे. आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत एकूण 20 संघ सहभागी होणार आहे. एकूण 55 सामने या स्पर्धेत खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना हा शनिवारी 1 जून रोजी खेळवण्यात येणार आहे. पहिल्या सामन्यात यूएस विरुद्ध कॅनेडा आमनेसामने असणार आहेत. तर 29 जून रोजी महाअंतिम सामना खेळवण्यात येणार आहे.
आयसीसी टी 20 वर्ल्ड कपमध्ये एकूण 20 संघांमध्ये एक ट्रॉफीसाठी चढाओढ पाहायला मिळणार आहे. या 20 संघांमध्ये टीम इंडिया, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, नेदरलँड्स, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, अफगाणिस्तान आणि बांगलादेश या 10 संघांनी थेट वर्ल्ड कपसाठी क्वालिफाय केलं. तर स्कॉटलँड,आयर्लंड, पापुआ न्यू गिनी, कॅनेडा, नेपाळ, ओमान, नामिबिया आणि यूगांडा या संघांनी पात्रता फेरीतून वर्ल्ड कपचं तिकीट मिळवलं. तर अमेरिका आणि वेस्ट इंडिज हे यजमान आहेत. त्यामुळे या 2 संघांना थेट तिकीट मिळालं.
वर्ल्ड कपमध्ये 1 ते 18 जून दरम्यान साखळी फेरीतील सामने पार पडतील. त्यानंतर 19 जून ते 24 जून दरम्यान सुपर 8 फेरी पार पडेल. 2 सेमी फायनल सामने अनुक्रमे 26 आणि 27 जून रोजी पार पडतील. तर 29 जून रोजी विश्व विजेता ठरेल.
आयसीसीने या टी 20 वर्ल्ड कपसाठी 20 संघांना 4 ग्रुपमध्ये विभागलंय. त्यानुसार एका ग्रुपमध्ये 5 संघांचा समावेश करण्यात आला आहे. ए ग्रुपमध्ये टीम इंडिया, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनेडा आणि यूएसएचा समावेश आहे. बी ग्रुपमध्ये इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, स्कॉटलँड आणि ओमान आहे. सी ग्रुपमध्ये न्यूझीलंड, 2 वेळा वर्ल्ड कप जिंकणारी, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, यूगांडा आणि पापुआ न्यू गुनिया आहे. तर डी ग्रुपमध्ये दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, नेदरलँड्स आणि नेपाळ टीम आहे.
पाहा संपूर्ण वेळापत्रक
Get ready for the ultimate cricket carnival in the West Indies and the USA 🥁
Unveiling the fixtures for the ICC Men’s T20 World Cup 2024 🗓️ 🤩#T20WorldCup | Details 👇
— ICC (@ICC) January 5, 2024
टीम इंडिया-पाकिस्तान हे 2 कट्टर प्रतिस्पर्धी एकाच ग्रुपमध्ये आहेत. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना पुन्हा एकदा हायव्होल्टेज सामना पाहायला मिळणार आहे. उभयसंघातील सामना हा 9 जून रोजी होणार आहे. हा सामना न्यूयॉर्कमध्ये पार पडणार आहे.