मुंबई | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेची सर्वत्र लगबग सुरु आहे. एकूण 10 संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. त्यापैकी वर्ल्ड कपसाठी 8 टीम जाहीर केली आहे. तर अजूनही श्रीलंका आणि बांगलादेशने टीमची घोषणा केलेली नाही. यंदा भारतात 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबरदरम्यान एकूण 45 दिवस 48 सामने पार पडणार आहेत. यासाठी तयारी ही अंतिम टप्प्यात आहे. या वर्ल्ड कपची तयारी असताना आता आयसीसी अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने मोठी घोषणा केली आहे. आयसीसीने अंडर 19 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर केलंय. आयसीसीने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.
अंडर 19 वर्ल्ड कपचं यजमानपद हे श्रीलंकेकडे आहे. या स्पर्धेचा थरार एकूण 23 दिवस रंगणार आहे. स्पर्धेला 13 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. तर 4 फेब्रुवारीला अंतिम सामना पार पडणार आहे. या स्पर्धेत एकूण 16 संघ सहभागी होणार आहेत. या संघांना एकूण 4 ग्रुपमध्ये विभागण्यात आलं आहे.
टीम इंडिया ए ग्रुपमध्ये आहे. टीम इंडियासोबत ए ग्रुपमध्ये आयर्लंड, अमेरिका आणि बांगलादेशचा समावेश आहे. बी ग्रुपमध्ये इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, विंडिज आणि स्कॉटलँड टीम आहे. सी ग्रुपमध्ये श्रीलंका, झिंबाब्वे, नामिबिया आणि ऑस्ट्रेलिया आहे. तर डी ग्रुपमध्ये नेपाळ, पाकिस्तान अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड टीम आहे.
प्रत्येक टीम आपल्या ग्रुपमधील 3 संघांविरुद्ध खेळेल. त्यानंतर प्रत्येक ग्रुपमधून 3 टीम अशा एकूण 12 टीम सुपर 12 मध्ये पोहचतील. त्यानंतर या हे 12 संघ 2 ग्रुपमध्ये 6-6 नुसार विभागले जातील. सुपर 6 मध्ये ग्रुप ए आणि ग्रुप डी मधील एकूण 6 संघांना एका ग्रुपमध्ये ठेवलं जाईल. तर ग्रुप बी आणि ग्रुप सीमधील एकूण 6 संघ एका ग्रुपमधील असतील.
सुपर 6 राऊंडमध्ये प्रत्येक टीम 2 मॅच खेळेल. या सुपर 6 राउंडमध्ये थोडी गंमत असणार आहे. सुपर 6 मधील टीम दुसऱ्या ग्रुपमधील 2 संघाविरुद्ध खेळेल. ते 2 टीम कशा ठरतील हे आपण समजून घेऊयात. टीम इंडिया ए ग्रुपमध्ये एक नंबर असलेली टीम ही ग्रुप डीमध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानवर असलेल्या संघांविरुद्ध खेळेल. याच पद्धतीने ग्रुप एमध्ये दुसऱ्या स्थानी असणारी टीम डी ग्रुपमधील पहिल्या आणि तिसऱ्या स्थानी असलेल्या संघाविरुद्ध खेळेल.
श्रीलंकेतील आर प्रेमदासा स्टेडियम, पी सारा ओवल, कोलंबो क्रिकेट क्लब, सिंहली स्पोर्ट्स आणि नॉनडेस्क्रिप्ट्स क्रिकेट कल्ब या 5 स्टेडियममध्ये वर्ल्ड कपचे सामने पार पडणार आहेत.
दरम्यान टीम इंडिया वर्ल्ड कपमधील आपला पहिला सामना हा रविवार 14 जानेवारी रोजी बांगलादेश विरुद्ध खेळणार आहे. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात 18 जानेवारीला यूएसएचं आव्हान असणार आहे. तर टीम इंडियाचा तिसरा आणि साखळी फेरीतील अखेरचा सामना हा शनिवार 20 जानेवारी रोजी आयर्लंड विरुद्ध होणार आहे.