आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत पाकिस्तानमध्ये जाऊन खेळण्यासाठी बीसीसीआय तयार नाही. तर यजमान पाकिस्तान भारतासाठी माघार घेण्यासाठी तयार नाही. या स्पर्धेचं आयोजन हे पाकिस्तानमध्ये करण्यात आल्याने भारताने सुरुवातीपासूनच तिथे जाऊन खेळण्यास नकार दर्शवला आहे. बीसीसीआय टीम इंडियाला पाकिस्तानमध्ये सुरक्षिततेच्या कारणामुळे पाठवण्यासाठी तयार नाही. तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तान या स्पर्धेचं हायब्रिड पद्धतीने आयोजन करण्यासाठी तयार नाही. बीसीसीआय असो किंवा पीसीबी दोन्ही क्रिकेट बोर्ड आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. कुणीही ‘बॅकफुटवर’ यायला तयार नाही. अशात पाकिस्तानचे माजी कर्णधार राशिद लतीफ यांनी आयसीसीला सल्ला दिला आहे. आयसीसीने बीसीसीआय आणि पीसीबीवर बंदी घालायला हवी. तसेच दोघांनाही आयसीसी स्पर्धेच्या यजमानपदाचा मान मिळायला नको, असं लतीफने आयसीसीला म्हटलंय.
“पाकिस्तान कदाचित टीम इंडियाविरुद्ध क्रिकेट न खेळण्याची अधिक शक्यता आहे. मी जर सत्तेत असतो तर मी हे मोठं पाऊल उचललं असतं. मी यासाठी कुणालाही जबाबदार ठरवणार नाही. टीम इंडियाला खेळायचं नसेल तर नका खेळू. मी पण आम्ही टीम इंडियाविरुद्ध खेळणार नाही, असं निर्णय घेतला असता”, असं राशिद लतीफ यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं.
राशिद लतीफ यांनी यानंतर आयसीसीला अजब सल्ला दिला. “आयसीसीने भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना कोणत्याही स्पर्धेच्या यजमानपदाचा मान देऊ नये. जोवर या दोन्ही देशांमधील संबंध सुधारत नाहीत तोपर्यंत आयसीसीने ही भूमिका घ्यायला पाहिजे”, असंही राशिद लतीफ यांनी म्हटलं.
“आयसीसीने 2023 मध्ये श्रीलंका आणि झिंबाब्बेवर 2019 साली बंदी घातली होती. या दोन्ही देशाच्या क्रिकेट बोर्डात राजकीय हस्तक्षेपामुळे आयसीसीने ही कारवाई केली होती. पण भारत आणि पाकिस्तानवर बंदी का घातली जात नाही? कारण आयसीसीला भारत-पाकिस्तान यांच्याकडून सर्वात जास्त पैसा मिळतो”, असं लतीफ यांनी म्हटलं.
राशिद लतिफ काय काय म्हणाले?
VIDEO | “There’s a big possibility that Pakistan can stop playing cricket against India. If I had would have been in power then yes, I may have taken this strong step. I would not blame anyone on this, if you don’t want to play then don’t play against us. If I had been there then… pic.twitter.com/BzcEh39Rbj
— Press Trust of India (@PTI_News) November 13, 2024
“यावेळेस बीसीसीआयची चूक आहे. कारण त्यांचं यावेळेस पाकिस्तानमध्ये न येण्यासाठीचं कारण हे ठोस नाही. पाकिस्तानमध्ये टीम इंडियाच्या खेळाडूंच्या सुरक्षेचा प्रश्न आहे, असं बीसीसीआयने लेखी द्यायला हवं होतं. आयसीसीची सिक्योरिटी टीम पाकिस्तानमध्ये आली होती. त्यांनी पाकिस्तान खेळण्यासाठी सुरक्षित असल्याचं म्हटलं होतं. जर बीसीसीआयला कसलीही भीती होती तर त्यांनी आयसीसीला आधी सांगायला हवं होतं”, असंही राशिद लतीफ यांनी म्हटलं.