टीम इंडियाचा बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील कसोटी मालिकेत 3-1 अशा फरकाने पराभूत व्हावं लागलं. टीम इंडियाने तब्बल 10 वर्षांनंतर बॉर्डर गावसकर ट्रॉफी गमावली. या मालिकेत आजी-माजी कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली दोघेही फ्लॉप ठरले. त्यामुळे या दोघांच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. अशात टीम इंडिया या बॉर्डर गावसकर ट्रॉफीनंतर इंग्लंड विरुद्ध टी 20i आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे. या दोन्ही मालिका मायदेशात खेळणार आहे. तसेच त्यानंतर आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचा थरार पार पडणार आहे.
रोहित आणि विराट या दोघांचं या निराशाजनक कामगिरीमुळे कसोटीच नाही तर वनडे टीममधील स्थान धोक्यात असल्याची चर्चा आहे. या दोघांनी निवृत्ती घ्यावी आणि युवा खेळाडूंसाठी व्यासपीठ उपलब्ध करुन द्यावं, असं काही जणांचं म्हणणं आहे. तसेच रोहित शर्माला कर्णधार न केल्यास ऑलराउंडर हार्दिक पंड्या याला नेतृत्वाची जबाबदारी दिली जाऊ शकते, असं मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं आहे. तसेच कर्णधारपदासाठी जसप्रीत बुमराह आणि संघातील इतर खेळाडूही दावेदार आहेत.
इंग्लंडने भारत दौऱ्यासाठी आणि चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघ जाहीर केलाय. चॅम्पियन्स ट्रॉफीत एकूण 8 संघ सहभागी होणार आहेत. इंग्लंडने संघ जाहीर करत आघाडी घेतली आहे. आता टीम इंडियासह उर्वरित केव्हा संघ जाहीर करणार? टीममध्ये कुणाला संधी मिळणार? याकडे साऱ्यांचं लक्ष लागून आहे. अशात चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघ जाहीर करण्यासाठीची अंतिम मुदत समोर आली आहे.
12 जानेवारी अंतिम मुदत!
CHAMPIONS TROPHY UPDATES. [Sahil Malhotra from TOI]
– India needs to pick their Provisional squad by January 12th.
– Teams can make changes till February 13th. pic.twitter.com/OiE2Gksi0v
— Johns. (@CricCrazyJohns) January 6, 2025
मीडिया रिपोर्ट्सनुसार, चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघ जाहीर करण्यासाठी 12 जानेवारी ही अंतिम मुदत आहे. तसेच 13 फेब्रुवारीपर्यंत संघात बदल करता येईल. तसेच इंग्लंडविरुद्ध वनडे सीरिजमध्ये संधी मिळणाऱ्या खेळाडूंनाच चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत संधी मिळेल, असं म्हटलं जात आहे. त्यामुळे भारतासाठी इंग्लंडविरुद्धची ही मालिका चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दृष्टीने निर्णायक असणार आहे. त्यामुळे बीसीसीआय निवड समितीसमोर कुणाला संधी द्यायची? कुणाचा समावेश करायचा आणि कुणाला वगळायचं? असं आव्हान असणार आहे. आता निवड समिती कुणाला संधी देणार आणि कुणाला नाही? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.