SCO vs WI | स्कॉटलँडचा मोठा उलटफेर, 7 विकेट्सने विजय, विंडिज वर्ल्ड कपमधून ‘आऊट’

| Updated on: Jul 01, 2023 | 8:21 PM

Icc Cricket World Cup Qualifiers 2023 Super Six | वर्ल्ड कप क्वालिफायर सुपर 6 राउंडमध्ये मोठा उलटफेर पाहायला मिळाला आहे. स्कॉटलँडने विंडिजचा धुव्वा उडवलाय.

SCO vs WI | स्कॉटलँडचा मोठा उलटफेर, 7 विकेट्सने  विजय, विंडिज वर्ल्ड कपमधून आऊट
Follow us on

हरारे | क्रिकेट विश्वातला सर्वात मोठा उलटफेर झाला आहे. आयसीसी वर्ल्ड कप क्वालिफायर सुपर 6 मधील तिसरा सामना हा स्कॉटलँड विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात स्कॉटलँडने 2 वेळा वर्ल्ड चॅम्पियन राहिलेल्या वेस्ट इंडिजवर 7 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला आहे. वेस्ट इंडिजचा या पराभवासह वर्ल्ड कप पात्रता फेरीतच आव्हान संपुष्टात आलं आहे. वेस्ट इंडिज क्रिकेट टीमसाठी हा मोठा झटका आहे.

वेस्ट इंडिज वर्ल्ड कपमधून ‘आऊट’

स्कॉटलँडचा विजय

वेस्ट इंडिजने स्कॉटलँडला विजयासाठी 182 धावांचं आव्हान दिलं होतं. स्कॉटलँडने हे आव्हान 43.3 ओव्हरमध्ये 3 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. स्कॉटलँडची विजयी धावांचा पाठलाग करताना वाईट सुरुवात झाली. ख्रिस्तोफर मॅकब्राइड हा पहिल्याच बॉलवर आऊट झाला. मात्र त्यानंतर मॅथ्यू क्रॉस आणि ब्रँडन मॅकमुलेन या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 125 धावांची भागीदारी केली. या दरम्यान मॅकमुलेन याने अर्धशतक पूर्ण केलं.

मॅकमुलने याला शतक करण्याची संधी होती. मात्र रोमॅरियो शेफर्ड याने मॅकमुलेन याला 69 धावांवर आऊट केलं. मॅकमुलेन याने 106 बॉलमध्ये 8 फोर आणि 1 सिक्सच्या मदतीने 69 धावांची निर्णायक खेळी केली. त्यानंतर जॉर्ज मुन्से 18 रन्स करुन आऊट झाला.

मात्र मॅथ्यू क्रॉस आणि कॅप्टन रिची बेरिंग्टन या दोघांनी स्कॉटलँडला विजयापर्यंत पोहचवलं. मॅथ्यूने 107 बॉलमध्ये 7 सिक्सच्या मदतीने 74 रन्सची नाबाद खेळी केली. तर बेरिंग्टन याने 14 बॉलमध्ये नाबाद 13 धावा केल्या. विंडिजकडून जेसन होल्डर, रोमॅरियो शेफर्ड आणि अकेल होसेन या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.

विंडिजची बॅटिंग

त्याआधी स्कॉटलँडने टॉस जिंकून वेस्ट इंडिजला बॅटिंगला बोलावलं. वेस्ट इंडिजकडून जेसन होल्डर याने सर्वाधिक 45 धावांची खेळी केली. रोमारिया शेफर्ड याने 36 रन्स केल्या. ब्रँडन किंग याने 22 आणि निकोलस पूरन याने 21 धावांचं योगदान दिलं. कॅप्टन शाई होप याने 13 आणि केविन सिंक्लेअर याने 10 रन्स जोडल्या. अल्झारी जोसेफ 6 आणि काइल मेयर्स 5 रन्सवर आऊट झाले. अकेल होसेन 6 धावांवर नाबाद परतला. तर दोघांना भोपळाही फोडता आला नाही.

स्कॉटलँडकडून ब्रँडन मॅकमुलेन याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. ख्रिस सोल, ख्रिस ग्रीव्हज आणि मार्क वॅट या तिघांनी प्रत्येकी 2 फलंदाजांना बाद केलं. तर सफियान शरीफ याने 1 विकेट घेत इतरांना चांगली साथ दिली.

दरम्यान 48 वर्षांपूर्वी विंडिजने पहिल्यांदा वर्ल्ड कप जिंकण्याची कामगिरी केली होती. मात्र त्याच विंडिजवर आता वर्ल्ड कपमधून बाहेर पडण्याची वेळ आली. त्यामुळे यंदा पहिल्यांदाच विंडिजशिवाय वर्ल्ड कप स्पर्धा खेळवण्यात येणार आहे.

स्कॉटलँड प्लेइंग इलेव्हन | रिची बेरिंग्टन (कर्णधार), मॅथ्यू क्रॉस (विकेटकीपर), ख्रिस्तोफर मॅकब्राइड, ब्रँडन मॅकमुलेन, जॉर्ज मुन्से, टॉमस मॅकिन्टोश, मायकेल लीस्क, ख्रिस ग्रीव्हज, मार्क वॅट, सफियान शरीफ आणि ख्रिस सोल.

वेस्ट इंडिज प्लेइंग इलेव्हन | शाई होप (कॅप्टन आणि विकेटकीपर), ब्रँडन किंग, जॉन्सन चार्ल्स, शमारह ब्रूक्स, निकोलस पूरन, काइल मेयर्स, केविन सिंक्लेअर, जेसन होल्डर, रोमॅरियो शेफर्ड, अकेल होसेन आणि अल्झारी जोसेफ.