मुंबई : दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा दारूण पराभव झाला आहे. भारताला एक डाव आणि 32 धावांनी पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. भारताचा दक्षिण अफ्रिकेतील आतापर्यंतचा लाजिरवाणा पराभव आहे. पराभवाचं झळ सहन करत असताना आयसीसीनेही दणका दिला आहे. टीम इंडियाच्या मॅच फीमधून दहा टक्के आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेतून दोन गुण कापले आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीसाठी प्रत्येक गुण महत्त्वाचा असताना आयसीसीच्या कारवाईमुळे टीम इंडिया बॅकफूटवर आली आहे. इतकंच काय तर पराभव आणि दोन गुण कापल्याने थेट सहाव्या स्थानावर घसरण झाली आहे. बांगलादेश आणि पाकिस्तानही गुणतालिकेत पुढे असल्याने भारताचं टेन्शन वाढलं आहे. स्लो ओव्हर रेटचा फटका टीम इंडियाला बसला. ठरलेल्या वेळेपेक्षा षटकं कमी टाकल्याचा टीम इंडियावर ठपका आहे.
आयसीसीने शुक्रवारी 29 डिसेंबर 2023 रोजी सांगितलं की, “आयसीसी एलीट पॅनेलचे सामनाधिकारी ख्रिस ब्रॉड यांनी टीम इंडियाला दंड ठोठावला आहे. भारताने ठरलेल्या वेळेपेक्षा दोन षटकं कमी टाकली.भारतीय कर्णधार रोहित शर्मा याने चूक कबूल केली आहे. त्यामुळे याबाबत सुनावणी घेण्याची गरज पडली नाही” आयसीसीच्या नियमानुसार प्रत्येक षटकासाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये एक गुण आणि सामना फीच्या 5 टक्के रक्कम कापली जाते. त्यामुळे एक षटकही ठरलेल्या वेळेपेक्षा कमी टाकल्यास महागात पडू शकतं. याचा सर्वाधिक फटका हा इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाला बसला आहे.
🚨 JUST IN: India have been penalised for slow over rate during the first #WTC25 Test against South Africa.
Details ⬇️https://t.co/dSqixki92Z
— ICC (@ICC) December 29, 2023
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत दक्षिण अफ्रिका एका विजयानेच अव्वल स्थानी पोहोचली आहे. दक्षिण अफ्रिकेची विजयी टक्केवारी 100 आहे. आतापर्यंत 2023-2025 साखळी फेरीतील एकच सामना खेळल्याने विजयी टक्केवारी 100 आहे. दुसऱ्या सामन्यात निकालावर आता अव्वल स्थान राहतं की जातं ते कळेल. तर न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश विजयी टक्केवारी 50 सह संयुक्तिकरित्या दुसऱ्या स्थानी आहेत. तर पाकिस्तान 45.83 विजयी टक्केवारीसह पाचव्या, तर 38.89 विजयी टक्केवारीसह भारत सहाव्या स्थानावर आहे. वेस्ट इंडिज सातव्या, इंग्लंड आठव्या, तर श्रीलंका नवव्या स्थानावर आहे.