मुंबई : वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत रोहित शर्माने टीम इंडियाचं जबरदस्त नेतृत्व केलं होतं. एकही सामना न गमवता अंतिम फेरी गाठली होती. तसेच संघाला गरजेवेळी मोठी धावसंख्या उभारून देण्यास मदत केली होती. पण अंतिम फेरीत नको तेच झालं आणि पराभवाचं तोंड पाहावं लागलं. अवघ्या एका पराभवाने जेतेपद दूर गेलं. त्यानंतर रोहित शर्मा वनडे क्रिकेट खेळणार नाही अशा वावड्या उठल्या. रोहित शर्माने अशी कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही. दुसरीकडे, टी20 वर्ल्डकप वेशीवर असल्याने रोहितचं संघात पुनरागमन झालं आहे. अफगाणिस्तानविरुद्धची मालिका त्याच्या नेतृत्वात 3-0 ने जिंकली. त्यामुळे आता टी20 वर्ल्डकपसाठी संघात पुनरागमन होणार हे जवळपास स्पष्ट झालं आहे. तिसऱ्या टी20 सामन्यात शतकी खेळी केल्याने आता रस्ता मोकळा झाला आहे. दुसरीकडे, वनडे संघाचं नेतृत्व करण्यासही तो योग्य असल्याचं स्पष्ट झालं आहे. हे आम्ही नाही तर खुद्द आयसीसीने सांगितलं आहे. आयसीसीने 2023 या वर्षातील वनडे संघ जाहीर केला आहे. या संघाचं नेतृत्व रोहित शर्माकडे सोपवलं आहे.
आयसीसीने 2023 या वर्षातील सर्वोत्तम वनडे संघ जाहीर केला आहे. या संघाचं नेतृत्व रोहित शर्माकडे असून एकूण 6 भारतीय खेळाडू आहेत. रोहित शर्मा, शुबमन गिलं, विराट कोहली, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव आणि मोहम्मद शमी या खेळाडूंचा संघात समावेश आहे. रोहित शर्मासोबत शुबमन गिलला ओपनिंगसाठी योग्य उमेदवार असल्याचं जाहीर केलं आहे. तर ऑस्ट्रेलियाच्या दोन खेळाडूंचा समावेश आहे. ट्रेव्हिस हेड आणि एडम झाम्पाला संघात स्थान मिळालं आहे.
Captain Rohit Sharma leading the charge in ODIs in 2023. 🔥🇮🇳 pic.twitter.com/A2bg5oeCCN
— Johns. (@CricCrazyJohns) January 23, 2024
दक्षिण अफ्रिकेच्या दोन खेळाडूंना या संघात स्थान मिळालं आहे. विकेटकीपिंगसाठी हेनरिच क्लासेनला पसंती देण्यात आली आहे. मार्को जानसेनची अष्टपैलू खेळाडू म्हणून निवड आहे. तर न्यूझीलंडचा डेरिल मिचेल हा एकमेव खेळाडू आहे. पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, इंग्लंड संघाच्या एकाही खेळाडूला संघात स्थान मिळालेलं नाही.
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, ट्रेव्हिस हेड, विराट कोहली, डेरिल मिचेल, हेनरिच क्लासेन (विकेटकीपर), मार्को जानसेन, एडम झाम्पा, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव आणि मोहम्मद शमी.