मुंबई | क्रिकेट विश्वातून या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. क्रिकेट चाहत्यांना ज्या क्षणाची गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षा होती, तो क्षण आला आहे. अखेर आयसीसीने वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. आयसीसीने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. वर्ल्ड कप स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. स्पर्धेतील पहिला सामना हा इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात खेळवण्यात येणार आहे. तसेच अंतिम सामना हा रविवारी 19 नोव्हेंबरला खेळवण्यात येणार आहे. सलामी आणि महाअंतिम सामन्याचं आयोजन हे अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे.
वनडे वर्ल्ड कपमधील सर्व सामने हे भारतातील एकूण 12 शहरांमध्ये खेळवण्यात येणार आहेत. या 12 पैकी महाराष्ट्रातील मुंबई आणि पुणे शहराचा समावेश आहे. देशातील चेन्नई,बंगळुरु, हैदराबाद, तिरुवनंतपूरम, मुंबई, पुणे, अहमदाबाद, लखनऊ, दिल्ली, गुवाहाटी, कोलकाता आणि धर्मशाळा या 12 शहरात सामने पार पडणार आहेत.
वनडे वर्ल्ड कप वेळापत्रकापेक्षा क्रिकेट चाहत्यांना टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान हा महामुकाबला केव्हा होणार, याकडे लक्ष लागलेलं होतं. टीम इंडिया वर्ल्ड कप मोहिमेतील आपला पहिला सामना हा 8 ऑक्टोबर रोजी खेळणार आहे. टीम इंडिया सलामीच्या सामन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळणार आहे. ही मॅच चेन्नईमध्ये खेळवण्यात येणार आहे. तर त्यानंतर 15 ऑक्टोबरला टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान हा हायव्होल्टेज सामना पार पडेल. हा महामुकाबला नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होईल.
वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेचं वेळापत्रक
GET YOUR CALENDARS READY! ?️?
The ICC Men's @cricketworldcup 2023 schedule is out now ⬇️#CWC23https://t.co/j62Erj3d2c
— ICC (@ICC) June 27, 2023
वर्ल्ड कप स्पर्धेत एकूण 10 संघांमध्ये ट्रॉफीसाठी लढाई असणार आहे. हा वर्ल्ड कप राउंड रॉबिन पद्धतीने पार पडणार आहे. प्रत्येक संघ एकमेंकाविरुद्ध खेळतील. एकूण 45 सामने पार पडतील. त्यानंतर सेमी फायनल आणि फायनल मॅच होईल.
पहिल्या सेमी फायनल सामन्याचं आयोजन हे मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. पहिली सेमी फायनल मॅच 15 नोव्हेंबरला होणार आहे. तर दुसरी सेमी फायनल मॅच 16 नोव्हेंबरला कोलकातामधील ईडन गार्डन स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. टीम इंडिया जर सेमी फायनलमध्ये पोहचली, तर तो सामना वानखेडे स्टेडियममध्ये होईल.