मुंबई | आयसीसीने वनडे वर्ल्ड कप 2023 नंतर रँकिंग जाहीर केली आहे. या आयसीसी वनडे रँकिंगमध्ये टीम इंडियाच्या खेळाडूंचा दबदबा पाहायला मिळत आहे. या रँकिंगमध्ये वर्ल्ड कप 2023 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या विराट कोहली याला मोठा फायदा झाला आहे. तर युवा सलामीवीर फलंदाज शुबमन गिल या मोठा झटका लागला आहे. तर कॅप्टन रोहित शर्मा याने मोठी झेप घेतली आहे. या रँकिगमध्ये अव्वल स्थानी कोण आहे, हे आणि सर्वकाही जाणून घेऊयात.
वनडे रँकिंगमध्ये विराट कोहलीने तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. तर शुबमन याच्या रेटिंग्स पॉइंट्समध्ये घट झाली आहे. मात्र त्यानंतरही शुबमन गिल पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझम याच्या पुढे आहे. विराटने वर्ल्ड कपमधील 46 दिवसांमध्ये सर्वकाही बदलून टाकलं आणि रँकिंमध्ये चांगलं स्थान मिळवलं.
वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात झाली. विराट 5 ऑक्टोबर रोजी नवव्या स्थानी होता. विराटने एका वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावांचा वर्ल्ड रेकॉर्ड केला. विराटने 45 दिवसांच्या कालावधीत 11 सामन्यांमध्ये सर्वाधिक 765 धावा केल्या. विराट याचा चांगला फायदा झाला. तर दुसऱ्या बाजूला शुबमन आणि बाबर या दोघांच्या रेटिंग्स पॉइंट्समध्ये फक्त 2 गुणांचं अंतर आहे. शुबमन गिल याच्या नावावर 826 आणि बाबरच्या नावे 824 रेटिंग्स पॉइंट्स आहेत.
रोहित शर्माने संपूर्ण वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान तोडफोड बॅटिंग करत टीम इंडियाला चांगली सुरुवात करुन दिली. रोहितने 11 सामन्यांमध्ये 500 पेक्षा अधिक धावा केल्या. रोहितला या कामगिरीचं आयसीसीकडून रिर्टन गिफ्ट मिळालं. रोहित या रँकिंगमध्ये चौथ्या स्थानी आला. अशाप्रकारे टीम इंडियाच्या फलंदाजांनी टॉप 5 मध्ये आपला दबदबा निर्माण केला आहे.
दरम्यान मोहम्मद सिराज याने गोलंदाजांच्या रँकिंगमधील अव्वल स्थान गमावलं आहे. सिराज वर्ल्ड कप दरम्यान पाकिस्तानच्या शाहीन शाह याला मागे टाकत नंबर 1 ठरला होता. तर जसप्रीत बुमराह चौथ्या आणि कुलदीप यादव सातव्या स्थानी आहे. दक्षिण आफ्रिकेचा केशव महाराज हा नंबर 1 गोलंदाज ठरला आहे. तर वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा मोहम्मद शमी 10 व्या क्रमांकावर आहे. तर बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसन याने ऑलराउंडर म्हणून आपलं अव्वलस्थान कायम राखलं आहे.