अहमदाबाद | आयसीसी वर्ल्ड कप 2023 स्पर्धेची ‘ओपनिंग’ 5 ऑक्टोबरपासून होत आहे. या वर्ल्ड कपसाठी सर्व तयारी झाली आहे. एकूण 10 संघांमध्ये 45 दिवस वर्ल्ड कप रंगणार आहे. स्पर्धेतील पहिला सामना हा इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. हा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम (मोटेरा स्टेडियम) आयोजित करण्यात आला आहे. या सामन्यासाठी क्रिकेट चाहत्यांनी तिकीटही बूक केलं आहे. तसेच असंख्य कोटी चाहते हे आपल्या टीव्ही आणि मोबाईलवरुनही क्रिकेट सामने पाहणार आहेत. आता हे सर्व सामने टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहायला मिळणार हे माहिती असायला हवंच. तसेच आता मोबाईलवर फुकटात वर्ल्ड कप मॅच पाहायला मिळणार आहे. त्यामुळे मोबाईलवर फुकटात सामने कुठे पाहायला मिळतील हे आपण जाणून घेऊयात.
आयसीसी वनडे वर्ल्ड कपमधील सर्व सामने हे एकूण 10 शहरांमधील स्टेडियममध्ये पार पडणार आहेत. मुंबई, पुणे, बंगळुरु, दिल्ली, चेन्नई, धर्मशाळा, लखनऊ, हैदराबाद, कोलकाता आणि अहमदाबाद या शहरांमधील स्टेडियममध्ये या सामन्यांचं आयोजन करण्यात आलं आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियम, पुण्यातील एमसीए गहुंजे स्टेडियम, बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियम, दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियम, चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियम, धर्मशाळातील एचपीसीए स्टेडियम, लखनऊमधील अटल बिहारी वाजपेयी स्टेडियम, कोलकातामधील इडन गार्डन स्टेडियम आणि अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये हे सामने खेळवण्यात येतील.
वर्ल्ड कपमधील सर्व सामने हे टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेलवर पाहायला मिळणार आहेत. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर विविध भाषांमध्ये कॉमेंट्री ऐकता येणार आहे. तर मोबाईलवर डिज्नी प्लस हॉटस्टार एपद्वारे सामने पाहता येतील. विशेष म्हणजे क्रिकेट चाहत्यांना यासाठी एकही रुपया खर्च करावा लागणार नाही. सर्व सामने हे फुकटात पाहता येणार आहेत. याआधी हॉटस्टारवर मॅच पाहण्यासाठी खिसा रिकामा करायला लागयचा. मात्र आता वाढत्या स्पर्धेमुळे हॉटस्टारने सामने फुकटात दाखवण्याचा निर्णय घेत क्रिकेट चाहत्यांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला आहे.
दरम्यान टीम इंडियाचा पहिला सामना हा 8 ऑक्टोबर रोजी होणार आहे. हा सामना चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये होणार आहे. या सामन्यानिमित्ताने आपण टीम इंडियाच्या सामन्यांचं वेळापत्रक आणि टीम इंडियाचे 15 शिलेदार कोण कोण आहेत, हे जाणून घेणार आहोत.
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया, चेन्नई, 8 ऑक्टोबर.
टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान, दिल्ली, 11 ऑक्टोबर.
टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान, अहमदाबाद, 14 ऑक्टोबर.
टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश, पुणे, 19 ऑक्टोबर.
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड, धर्मशाळा, 22 ऑक्टोबर.
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड, लखनऊ, 29 ऑक्टोबर.
टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका, मुंबई, 2 नोव्हेंबर.
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका, कोलकाता, 5 नोव्हेंबर.
टीम इंडिया विरुद्ध नेदरलँड्स, बंगळुरु, 12 नोव्हेंबर.
वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), हार्दिक पांड्या (उपकर्णधार ), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन आणि सूर्यकुमार यादव.