मुंबई | क्रिकेट चाहत्यांना आगामी आशिया कप आणि त्यानंतर भारतात होणाऱ्या आयसीसी वनडे वर्ल्ड कपबाबत उत्सूकता आहे. भारताला 12 वर्षांनंतर वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेचं यजमानपद मिळालं आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांचा उत्साह आणखी वाढलाय. आयसीसीने 27 जून रोजी वर्ल्ड कप स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर केलं. त्यानुसार, या स्पर्धेतील सलामीचा सामना हा 5 ऑक्टोबरला खेळवण्यात येणार आहे. तर अंतिम सामना 19 नोव्हेंबर पार पडणार आहे. स्पर्धेतील पहिला आणि शेवटचा सामना हा अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पार पडणार आहे.
तर दुसऱ्या बाजूला टीम इंडियाच्या वर्ल्ड कप मोहिमेला 8 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. टीम इंडिया पहिला सामना हा ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळणार आहे. तर 15 ऑक्टोबर रोजी टीम इंडिया कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध भिडणार आहे. त्यामुळे भारत-पाकिस्तानसह क्रिकेट विश्वाचं लक्ष लागून राहिलं आहे. मात्र बहुप्रतिक्षित वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा केव्हा होणार, असा प्रश्न क्रिकेट रसिकांना पडलाय. याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
वर्ल्ड कप स्पर्धेसाठी संघ जाहीर करावा, आयसीसीने असं सर्व टीमना सांगितलंय. मिळालेल्या माहितीनुसार, सर्व संघांना वर्ल्ड कप स्पर्धेच्या एक महिन्याआधी टीम जाहीर करावी लागणार आहे. वर्ल्ड कपला 5 ऑक्टोबरला सुरुवात होणार आहे. त्यानुसार 5 सप्टेंबरपर्यंत टीम जाहीर करावी लागणार आहे.
दरम्यान बीसीसीआयने काही दिवसांपूर्वी टीम इंडियाचा माजी खेळाडू आणि मुंबईकर अजित आगरकर यांची निवड समिती अध्यक्षपदी नियुक्ती केली. चेतन शर्मा याच्या राजीनाम्यानंतर निवड समिती अध्यक्ष हे पद रिक्त होतं. त्यानंतर सर्वकाही सोपस्कार पार पडल्यानंतर अजित आगरकर यांची निवड केली गेली. त्यामुळे आता अजित आगरकर आयसीसी वनडे वर्ल्ड टीम इंडियासाठी खेळाडू निवडणार आहे.
अजित आगरकर यांनी निवड समिती अध्यक्ष म्हणून पहिल्यांदा एशियन गेम्स 2023 साठी टीम निवडली. टीम इंडिया चीनमध्ये ही स्पर्धा खेळणार आहे. या स्पर्धेसाठी मेन्स सीनिअर टीम इंडियाच्या कर्णधारपदाची जबाबदारी ही पुणेकर ऋतुराज गायकवाड याला देण्यात आली आहे. तसेच रिंकू सिंह, यशस्वी जयस्वाल या आणि यासारख्या युवा खेळाडूंची पहिल्यांदाच टीम इंडियात निवड करण्यात आली आहे.