मुंबई | आयसीसीच्या 13 व्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेची सुरुवात 5 ऑक्टोबरपासून मोठ्या धडाक्यात होणार आहे. त्याआधी 4 ऑक्टोबर रोजी रंगारंग कार्यक्रमही होणार आहे. एकूण 10 संघ आणि त्यांचे 15 खेळाडू, सपोर्ट स्टाफ, ग्राउंड स्टाफ आणि क्रिकेट चाहते वर्ल्ड कपसाठी सज्ज आहेत. एकूण 45 दिवस 48 सामन्यांचा थरार हा एकूण 10 स्टेडियममध्ये रंगणार आहे. यासाठी सर्वच तयार आहेत. टीम इंडियाचा पहिला सामना हा 8 ऑक्टोबर रोजी आहे. मात्र सर्वांचं लक्ष टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान या सामन्याकडे लागून राहिलं आहे.
टीम इंडियाचा आतापर्यंत वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान विरुद्धचा रेकॉर्ड हा अप्रतिम आहे. पाकिस्तानला आतापर्यंत गेल्या 12 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाला एकदाही पराभूत करता आलेलं नाही. टीम इंडियाने पाकिस्तानचा वनडे वर्ल्ड कपमध्ये 7 च्या 7 सामन्यात धुव्वा उडवलाय. मात्र वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया विरुद्ध जिंकू न शकलेली पाकिस्तान एकमेव टीम नाही, असे अनेक संघ आहेत.
वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानशिवाय केनिया, आयर्लंड, नेदरलँड्स, यूएई, नामिबिया, अफगाणिस्तान, बर्मूडा आणि आणि पूर्व आफ्रिका या संघांना अद्याप टीम इंडियावर विजय मिळवण्यात यश आलेलं नाही. टीम इंडिया विरुद्ध केनिया एकूण 4 वेळा वर्ल्ड कपमध्ये भिडले. मात्र या चारही सामन्यात टीम इंडियानेच मैदान मारलं.
तसेच आयर्लंड आणि नेदरलँड्स या दोन्ही संघांना वनडे वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया विरुद्ध प्रत्येकी 2 वेळा पराभूत व्हावं लागलंय. तसेच अफगाणिस्तान, बर्मूडा, पूर्व आफ्रिका, यूएई आणि नामिबिया या संघांना प्रत्येकी 1 वेळा टीम इंडियाने पराभूत केलंय.
दरम्यान या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान हा महामुकाबला 14 ऑक्टोबर रोजी होणार आहे. या सामन्याचं आयोजन हे अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. या सामन्याकडे संपूर्ण क्रिकेट विश्वाचं लक्ष लागून आहेत.
आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 साठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), हार्दिक पांड्या (उपकर्णधार ), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन आणि सूर्यकुमार यादव.