टी20 क्रिकेट म्हंटलं की चौकार आणि षटकारांची आतषबाजी..येथे गोलंदाजांना तसं काही स्थान मिळत नाही. चुकून एखाद दुसरा गोलंदाज आपली छाप पाडण्यात यशस्वी ठरतो. गोलंदाजांना इकोनॉमी रेट शाबूत ठेवणं हे देखील मोठं आव्हान असतं. त्यामुळे या फॉर्मेटमध्ये गोलंदाजांसमोर टांगती तलवार असते. एखादा फॉर्मात असलेला फलंदाज समोर उभा असेल तर काही खरं नसतं. याचं उत्तम उदाहरण सांगायचं तर युवराज सिंग-स्टुअर्ट ब्रॉड, रिंकु सिंह आणि यश दयाल… अशात फलंदाजांना पाटा पिच मिळालं तर गोलंदाजांची धुलाई निश्चित असते. पण याच क्रिकेट फॉर्मेटमध्ये एका गोलंदाजाने मोठी कामगिरी केली आहे. हाँगकाँग क्रिकेट संघाच्या आयुष शुक्लाने मोठा कारनामा केला आहे. चार षटकं निर्धाव टाकत एका विक्रमाची नोंद केली आहे. तुम्ही जे वाचलं ते अगदी खरं आहे. चार षटकात 24 चेंडू टाकत एकही धाव दिली नाही. हा कारनामा त्याने आयसीसी मेन्स टी20 वर्ल्डकप आशिया कप पात्रता फेरीतील एका सामन्यात केला आहे.
हाँगकाँग आणि मंगोलिया यांच्यात सामना पार पडला. या सामन्यात हाँगकाँगने प्रथम गोलंदाजी केली. यात वेगवान गोलंदाज आयुष शुक्लाने जबरदस्त गोलंदाजी केली. टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 4 षटकं निर्धाव टाकणारा तो तिसरा गोलंदाज ठरला आहे. यात आयुष शुक्लाने एक विकेट देखील घेतली. आयुष शुक्ला आधी हा कारनामा न्यूझीलंडच्या लॉकी फर्ग्युसनने केला आहे. त्याने टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेत पापुआ न्यू गिनी संघाविरुद्ध चार षटकं निर्धाव टाकली होती. तसेच 3 गडी बाद केले होते. तर 2021 मध्ये कॅनडाच्या साद बिन जफरने पनामाविरुद्ध खेळताना चार षटकं निर्धाव टाकली होती.
हाँगकाँगचा आयुष शुक्ला 2022 आशिया कप स्पर्धेत भारताविरुद्ध खेळला होता. या सामन्यात त्याने रोहित शर्माची विकेट घेतली होती. तेव्हा त्याच्या गोलंदाजीचं खूप कौतुक झालं होतं. आयुष शुक्लाने हाँगकाँगसाठी 35 टी20 सामने खेळला आहे. यात त्याने 33 विकेट घेतल्या असून त्याचा इकॉनॉमी रेट हा 8.3 आहे. 2022 पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहे.