क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. बांगलादेशला मोठा झटका लागला आहे. आयसीसी अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने आगामी महिला टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेचं आयोजन हे यूएईत करण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी ही स्पर्धा बांगलादेशमध्ये पार पडणार होती. मात्र बांगलादेशमध्ये असलेली अराजकता आणि तेथील वातावरण पाहता आयसीसीने हा मोठा निर्णय घेतला आहे. आयसीसीने खेळाडूंची सुरक्षितता हा मुद्दा सर्वतोपरी ठेवत स्पर्धेचं आयोजन यूएईत करण्याचं ठरवलंय. तसेच सामने जरी यूएईत होणार असले तरी आयसीसीने बांगलादेशचं यजमानपद कायम ठेवलं आहे. आयसीसीने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे. या नवव्या टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेचं आयोजन हे 3 ते 20 ऑक्टोबर दरम्यान करण्यात आलं आहे. या स्पर्धेत एकूण 10 संघ सहभागी होणार आहेत.
बांगलादेशात या महिला टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी सर्व तयारी झाली होती. मात्र बांगलादेशात काही दिवसांपूर्वी जुलै महिन्यात आरक्षणावरुन परिस्थिती चिघळली. विद्यार्थ्यांनी आंदोलनाला सुरुवात केली. आंदोलनाला हिंसक स्वरुप प्राप्त झालं. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. मात्र त्यानंतरही हिंसाचार सुरुच होता. त्यामुळे या सर्व परिस्थितीचा फटका या स्पर्धेला बसू नये, याची खबरदारी घेत हा यूएईत वर्ल्ड कपच्या आयोजनाचा निर्णय घेतला गेला आहे.
बांगलादेशमधील स्थिती पाहता आयसीसी अलर्ट झाली होती. अशात या स्पर्धेचं आयोजन कुठे करायचं? यासाठी शोधाशोध सुरु झाली होती. भारताने स्पर्धेच्या आयोजनासाठी नकार दिला होता. तसेच झिंबाब्वे यजमानपदासाठी इच्छूक होती. त्यामुळे आयोजनाचा मान हा अखेर यूएईला मिळाला.
यूएईमध्ये वूमन्स टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेचं आयोजन
The ninth edition of ICC Women’s #T20WorldCup to be held in October 2024 has been relocated to a new venue.
Details 👇https://t.co/20vK9EMEdN
— ICC (@ICC) August 20, 2024
आयसीसीने बांगलादेश क्रिकेट बोर्डाला आयोजनाबाबत त्यांची तयारी आहे की नाही? हे सांगण्यासाठी 5 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानुसार 20 ऑगस्टला ही मुदत संपली. आयसीसीची मंगळवारी 20 ऑगस्टला बैठक पार पडली. या स्पर्धेच्या आयोजनाबाबत बैठकीत चर्चा झाली. त्यानुसार बांगलादेशमध्ये स्पर्धा न खेळवण्याबाबत एकमत झालं. त्यानंतर हा निर्णय घेतला गेला. बांगलादेश क्रिकेट बोर्डालाही नाईलाजाने हा निर्णय मान्य करावा लागला. अशाप्रकारे यूएईला यजमान म्हणून मान मिळाला. मात्र बांगलादेशकडेच या स्पर्धेच्या अधिकृत यजमानपदाचा मान असणार आहे.