मुंबई : क्रिकेट विश्वात दिवसभरात अनेक मोठ्या घडामोड घडत आहेत. आधी आयसीसीने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्याची तारीख आणि ठिकाण जाहीर केलं. त्यानंतर आता आयसीसी आयसीसी टी 20 रँकिंग जाहीर केली आहे. आयसीसीने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. या आयसीसी टी 20 रँकिंगमध्ये टीम इंडियाच्या 3 खेळाडूंचा जलवा पाहायला मिळाला आहे. या 3 खेळाडूंमध्ये बॅट्समन, बॉलर आणि ऑलराउंडर अशा तिघांचा समावेश आहे. या तिघांनी टी 20 सीरिजमध्ये केलेल्या कामगिरीचं बक्षिस मिळालं आहे. या रँकिंगमध्ये कोणत्या यादीत कोणता खेळाडू कितव्या क्रमांकावर आहे, हे आपण जाणून घेणार आहोत. या रँकिंगमध्ये टीम इंडियाचा ओपनर शुबमन गिल, ऑलराउंडर हार्दिक पंड्या आणि बॉलर अर्शदीप सिंह या तिघांचा समावेश आहे.
शुबमन गिल टीम इंडियासाठी सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करतोय. शुबमन सातत्यापूर्ण मोठी खेळी करतोय. त्याला या कामगिरीसाठीच जानेवारी महिन्यातील ‘प्लेअर ऑफ द मंथ’ या पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आलं आहे.
शुबमनने फलंदाजांच्या रँकिंगमध्ये थेट 168 क्रमांकाची मोठी झेप घेतली आहे. याआधी शुबमन टी 20 रँकिंगमध्ये पहिल्या 100 मध्येही नव्हता. मात्र शुबमन आता 6 सामन्यांनंतर 30 व्या क्रमांकावर विराजमान झाला आहे.
शुबमनने न्यूझीलंड विरुद्धच्या टी 20 मालिकेत 63 बॉलमध्ये 126 रन्स केल्या होत्या. यामध्ये त्याने 7 सिक्स आणि 13 चौकार ठोकले होते. शुबमन पदार्पणाच्या एका महिन्यातच आयसीसी टी 20 रँकिंगमध्ये पहिल्या 5 भारतीय फलंदाजांमध्ये पोहचला.
कॅप्टन हार्दिक पंड्या याने न्यूझीलंड विरुद्धच्या टी 20 सीरिजमध्ये बॉलिंग आणि बॅटिंग या दोन्ही आघाड्यांवर जोरदार कामगिरी केली. हार्दिकला याचाच फायदा हा ऑलराउंडर रँकिंगमध्ये झाला आहे. हार्दिकला एका स्थानाचा फायदा झाला आहे. हार्दिक यासह रँकिंगमध्ये तिसऱ्या स्थानावरुन दुसऱ्या स्थानावर पोहचला आहे.
ऑलराउंडर खेळाडूंच्या रँकिंगमध्ये अव्वल स्थानी बांगलादेशचा शाकिब अल हसन आहे. हार्दिक आणि शुबमन यांच्या दोघांमध्ये फक्त 2 रेटिंग्स पॉइंट्सचा फरक आहे. शाकिबच्या नावावर 252 तर हार्दिकच्या नावे 250 रेटिंग्स पॉइंट्स आहेत. त्यामुळे आता हार्दिकला 1 नंबर होण्याची सुवर्णसंधी आहे.
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह यालाही गोलंदाजांच्या रँकिंगमध्ये मोठा फायदा झालाय. अर्शदीपने 8 स्थानांची झेप घेतली आहे. अर्शदीप आधी 21 व्या क्रमांकावर होता. आता तो 635 रेटिंग्ससह 13 व्या क्रमांकावर पोहचला आहे.