T20 WC 2024 | झिंबाब्वेचा बाजार उठला, टी 20 वर्ल्ड कपमधून ‘आऊट’

| Updated on: Nov 30, 2023 | 4:47 PM

Icc T20I World Cup 2024 | आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेचं आयोजन हे जून महिन्यात करण्यात आलं आहे. या स्पर्धेसाठी 20 संघ निश्चित झाले आहेत. मात्र झिंबाब्वेला या वर्ल्ड कपसाठी क्वालिफाय करण्यात अपयश आलं आहे.

T20 WC 2024 | झिंबाब्वेचा बाजार उठला, टी 20 वर्ल्ड कपमधून आऊट
Follow us on

मुंबई | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 नंतर आता क्रिकेट चाहत्यांना टी 20 वर्ल्ड कप 2024 चे वेध लागले आहेत. या स्पर्धेत एकूण 20 संघ सहभागी होणार आहेत. त्यापैकी 19 संघ आधीच ठरले होते. तर आता वीसावा संघही निश्चित झाला आहे. यूगांडा क्रिकेट टीमने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. तर दुसऱ्या बाजूला वनडेनंतर आता आणखी एक टीम टी 20 वर्ल्ड कपमधून बाहेर पडली आहे. गुरुवारी 30 नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिका क्वालिफेकशनमधील अंतिम सामन्यात यूगांडाने रवांडावर विजय मिळवला. यूगांडाचा हा पाचवा विजय ठरला. यासह यूगांडा नामिबियानतंर साउथ आफ्रिका क्वालिफिकेशमधून वर्ल्ड कपसाठी पात्र ठरणारी दुसरी टीम ठरली आहे.

झिंबाब्वेचं पॅकअप

झिंबाब्वेने गेल्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानसारख्या बलाढ्य संघाला पाणी पाजत उलटफेर केला होता. मात्र यंदा त्याच झिंबाब्वेला क्वालिफाय करता आलं नाही. त्याआधी झिंबाब्वेला आयसीसी वनडे वर्ल्ड कप क्वालिफायरमध्ये उल्लेखनीय कामगिरी करुनही क्वालिफाय करता आलं नाही. झिंबाब्वेला टॉप 20 संघांमध्येही आपलं स्थान निश्चित करता आलं नाही. त्यामुळे झिंबाब्वे टीम आणि बोर्डासाठी चिंताजनक बाब आहे.

वर्ल्ड कपसाठी क्वालिफाय करणारे 20 संघ

या टी 20 वर्ल्ड कप 2024 मध्ये एकूण 20 संघ सहभागी होणार आहेत. या वर्ल्ड कपचं यजमानपद हे यूएसए आणि वेस्टइंडिजमध्ये करण्यात आलं आहे. त्यामुळे या दोन्ही संघांनी थेट क्वालिफाय केलं आहे. तर काही संघांनी आयसीसी रँकिंगच्या आधारे थेट क्वालिफाय केलंय. यामध्ये टीम इंडिया, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, नेदरलँड्स, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यशस्वी ठरली. यामध्ये अफगाणिस्तान आणि बांगलादेशचाही समावेश आहे.

टी 20 वर्ल्ड कप 2024 साठी 20 संघ

त्यानंतर यूरोपमधून स्कॉटलँड आणि आयर्लंड या दोन्ही संघ टी 20 वर्ल्ड कप 2024 साठी पात्र ठरले. पापुआ न्यू गिनीने स्थान मिळवलं. अमेरिका क्वालिफायरमधून कॅनेडाने आणि आशियातून नेपाळ आणि ओमान या दोन्ही संघांनी क्वालिफाय केलं. तर आफ्रिका क्वालिफायरमधून नामिबिया आणि यूगांडा हे दोन संघ निश्चित झाले आहेत. या टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत एकूण 20 संघ आहेत. त्या 20 संघांना प्रत्येकी 4 नुसार एकूण 5 ग्रुपमध्ये विभागण्यात येणार आहे.