मुंबई : वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. वर्ल्डकप स्पर्धेला 5 ऑक्टोबर 2023 पासून सुरुवात होणार आहे. अंतिम फेरीचा सामना 19 नोव्हेंबर 2023 रोजी असणार आहे. एकूण 46 दिवस क्रीडाप्रेमींना मेजवानी मिळणार आहे. टीम इंडिया या सामन्यात 9 सामने खेळणार आहे. पहिलाच सामना 8 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध असणार आहे. असं असलं तरी पाच सामने खूपच महत्त्वाचे ठरणार आहेत. चला जाणून घेऊयात या सामन्यात कशा पद्धतीने जुना हिसाब चुकता करण्यासाठी जीवाचं रान केलं जाईल ते..
स्पर्धेतील पहिलाच सामना इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात रंगणार आहे. कारण मागच्या वर्ल्डकपमध्ये हे दोन संघ अंतिम फेरीत एकमेकांसमोर उभे ठाकले होते. हा रोमहर्षक सामना प्रत्येक क्रीडाप्रेमीच्या आजही लक्षात आहे. हा सामना बरोबरीत सुटल्याने दोनदा सुपर ओव्हरमध्ये गेला. मात्र तिथेही ड्रॉ झाल्याने चौकाराच्या संख्येवर इंग्लंडला विजयी घोषित करण्यात आलं. या विजयावर क्रीडाविश्वातून जोरदार टीका झाली होती. आता न्यूझीलंडला पहिल्या सामन्यात जुना हिशेब चुकता करण्याची संधी आहे.
न्यूझीलंडने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजी स्वीकारली होती. या सामन्यात न्यूझीलंडने 8 गडी गमवून 241 धावा केल्या. विजयासाठी 242 धावा असताना इंग्लंडचा संपूर्ण संघ 241 धावांवर बाद झाला आणि सामना ड्रॉ झाला. सुपर ओव्हरमध्ये इंग्लंड प्रथम फलंदाजी करताना 15 धावा केल्या. तर न्यूझीलंडने 1 गडी गमवून 15 धावा केल्या होत्या.
कर्णधार केन विलियमसन हा दुखापतीतून सावरत असून इंग्लंडचा वचपा काढण्यासाठी सज्ज असेल. दुसरीकडे, इंग्लंडचा आत्मविश्वास दुणावलेला आहे. 2019 वनडे वर्ल्डकप आणि 2022 टी 20 वर्ल्डकप जिंकल्याने न्यूझीलंडला हा सामना वाटतो तितका सोपा जाणार नाही. हा सामना 5 ऑक्टोबर 2023 रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आहे.
भारत आणि पाकिस्तान पारंपरिक प्रतिस्पर्धी आहेत. वर्ल्डकपपेक्षा या दोन्ही संघांच्या चाहत्यांना या सामन्यातील विजय महत्त्वाचा असतो. दोन्ही संघाचे चाहते अनेकदा मैदानाबाहेर एकमेकांना भिडल्याचं पाहायला मिळालं आहे. वनडे वर्ल्डकप इतिहासात दोन्ही संघ सातवेळा एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. सातही सामने भारताने जिंकले आहेत. भारत विरुद्ध पाकिस्तान सामना 15 ऑक्टोबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे.
मागच्या वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाने 50 षटकात 5 गडी गमवून 336 धावा केल्या होत्या. या सामन्यात रोहित शर्माने 140 धावांची खेळी केली होती. 40 षटकात 6 गडी बाद 2012 ही धावसंख्या असताना पावसाने हजेरी लावली आणि डीएलएस नियमानुसार भारताला 89 धावांनी विजयी घोषित करण्यात आलं.
मागच्या टी 20 वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानने भारताला पराभवाची धूळ चारली होती. तसेच मौका मौका जाहिरातीचं तोंड बंद केलं होतं. त्यामुळे पाकिस्तान भारत यांच्यातील सामना रोमहर्षक होईल यात शंका नाही.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 8 ऑक्टोबर रोजी सामना होणार आहे. ऑस्ट्रेलियाने भारताचं स्वप्न अनेकदा भंग केलं आहे. वनडे, टी 20, कसोटी सामन्यात भारताला जेतेपदापासून दूर ठेवलं आहे. गेल्या दहा वर्षात ऑस्ट्रेलियाने कायम भारताची जेतेपदाची वाट अडवली आहे. त्यामुळे हा सामनाही तितकाच ताकदीचा होणार आहे.
1987 चा पहिला वनडे वर्ल्डकप ऑस्ट्रेलियाने भारतीय भूमीवर जिंकला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने मागे वळून पाहिलं नाही. नुकतंच ऑस्ट्रेलियाने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत भारताला पराभूत करत जेतेपदावर नाव कोरलं होतं. भारताचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधला सलग दुसरा पराभव होता.
वनडे इतिहासात ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तगडी स्पर्धा पाहायला मिळाली आहे. ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचं जेतेपदाचं स्वप्न भंग केल्याचा इतिहास आहे. आता दोन्ही 13ऑक्टोबरला लखनऊमध्ये आमनेसामने येणार आहेत. 2019 वर्ल्डकपमध्ये दक्षिण आफ्रिकेने साखळी फेरीत तीन सामने गमावले होते. मात्र चौथ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभवाचं पाणी पाजलं होतं. फाफने या सामन्यात शतक ठोकलं होतं.
आयपीएल 2023 मध्ये फाफ डु प्लेसिसने चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे त्याचा वनडे वर्ल्डकपमध्ये चांगला फायदा होईल अशी शक्यता आहे. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेकडे कागिसो रबाडा, एनरिच नॉर्त्जे आणि लुंगी एनगिडी या गोलंदाजांची फौज आहे.
आयसीसी स्पर्धेत बांगलादेश आणि अफगाणिस्तान या संघांना लिंबूटिंबू संघ म्हणून गणलं जातं. पण एखाद्या मोठ्या संघाचं स्वप्न भंग करण्यात मागेपुढे पाहात नाही हा इतिहास आहे. असं असताना आयसीसी स्पर्धेत बांगलादेश आणि अफगाणिस्तान यांच्या प्रतिस्पर्धा दिसून आली आहे.
अफगाणिस्तानकडे गोलंदाजांची फौज आहे. स्पिनर राशिद खान, मुजीब उर रहमान फिरकीपटू आणि फझलहक फारुकी अशी गोलंदाजांची फौज आहे. तर गोलंदाजीचं अस्त्र भेदण्यासाठी बांगलादेशकडे लिटन दास आणि अष्टपैलू शाकिब अल हसन असणार आहेत.