BAN vs AFG | बांगलादेशची वर्ल्ड कपमध्ये धमाकेदार सुरुवात, अफगाणिस्तानवर 6 विकेट्सने विजय

| Updated on: Oct 07, 2023 | 5:42 PM

Bangladesh vs Afghanistan Icc World Cup 2023 | बांगलादेशने अफगाणिस्तानवर आपल्या पहिल्याच सामन्यात एकतर्फी विजय मिळवला आहे. मेहदी हसन मिराज याने बांगलादेशच्या विजयात मोठी भूमिका बजावली.

BAN vs AFG | बांगलादेशची वर्ल्ड कपमध्ये धमाकेदार सुरुवात, अफगाणिस्तानवर 6 विकेट्सने विजय
Follow us on

धर्मशाळा | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधील डबल हेडरमधील पहिला सामना हा बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात पार पडला. हा सामना बांगलादेशने 6 विकेट्सने जिंकत विजयी सुरुवात केली आहे. अफगाणिस्तानने विजयासाठी दिलेलं 157 धावांचं माफक आव्हान बांगलादेशने 4 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. बांगलादेशने हे आव्हान 94 बॉल राखून पूर्ण केलं. बांगलादेशने 34.4 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 158 धावा केल्या. मेहदी हसन मिराज आणि नजमूल शांतो ही जोडी विजयाची शिल्पकार ठरली.

बांगलदेशने 157 धावांचा पाठलाग करताना 2 विकेट्स झटपट गमावले. तांझिद हसन 5 आणि लिटॉन दास 13 धावांवर बाद झाले. त्यामुळे बांगलादेशचा स्कोअर 2 आऊट 27 असा झाला.मात्र त्यानंतर मेहदी हसन मिराज आणि नजमूश शांतो या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 97 धावांची भागीदारी केली. या दरम्यान मेहदी हसन याने अर्धशतक केलं. त्यानंतर मेहदी 73 बॉलमध्ये 57 धावांवर आऊट झाला. त्यानंतर कॅप्टन शाकिब अल हसन मैदानात आला. शाकिब याने 14 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला.

त्यानंतर मुश्फिकर रहिम याच्या मदतीने नजमूल शांतो याने बांगलादेशला विजयापर्यंत पोहचवलं. रहिम याने नॉट आऊट 2 धावा केल्या. तर नजमूल शांतो याने 83 बॉलमध्ये 3 चौकार आणि 1 सिक्सच्या मदतीने नाबाद 59 धावा केल्या. तर अफगाणिस्तानकडून फझलहक फारुकी, नवीन उल हक आणि अझमतुल्लाह ओमरझई या तिघांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

अफगाणिस्तानची घसरगुंडी

त्याआधी बांगलादेशने टॉस जिंकून अफगाणिस्तानला बॅटिंगसाठी भाग पाडलं. अफगाणिस्तानची आश्वासक सुरुवात झाली. मात्र बांगलादेशने अफगाणिस्तान सलग धक्के देत ऑलआऊट करत करेक्ट कार्यक्रम केला. बांगलादेशच्या गोलंदाजांनी अफगाणिस्तानला 37.2 ओव्हरमध्ये 156 धावांवर ऑलआऊट केलं. अफगाणिस्तानकडून गुरबाज याने सर्वाधिक 47 धावा केल्या. अझमतुल्लाह आणि इब्राहीम झद्रान या दोघांनी प्रत्येकी 22 धावा केल्या. तर रहमत आणि कॅप्टन शाहिदी या दोघांनी प्रत्येकी 18-18 धावांचं योगदान दिलं. तर इतरांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही.

बांगलादेशकडून मेहदी हसन मिराज आणि शाकिब अल हसन या दोघांनी 3-3 विकेट्स घेतल्या. शोरिफूल इस्लाम याने 2 जणांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर तास्किन अहमद आणि मुस्तफिजुर या दोघांच्या खात्यात 1-1 विकेट गेली.

अफगाणिस्तान प्लेईंग ईलेव्हन | हशमतुल्ला शाहिदी (कॅप्टन), रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झद्रान, रहमत शाह, मोहम्मद नबी, नजीबुल्ला झदरन, अजमतुल्ला उमरझाई, रशीद खान, मुजीब उर रहमान, नवीन उल हक आणि फजलहक फारुकी.

बांगलादेश प्लेईंग इलेव्हन | शाकीब अल हसन (कर्णधार), तांझिद हसन, लिटॉन दास, नजमुल हुसेन शांतो, मेहदी हसन मिराझ, मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), तौहिद हृदोय, महमुदुल्ला, तस्किन अहमद, शरीफुल इस्लाम आणि मुस्तफिजुर रहमान.